निष्ठावान कार्यकर्त्याच्या कार्याचा सन्मान व्हावा : संजयकुमार सुरवसे यांची स्वीकृत नगरसेवकपदी संधी देण्याची मागणी



  लातूर, दि. २३ (प्रतिनिधी): भारतीय जनता पक्षासाठी गेल्या तब्बल ३५ वर्षांपासून निष्ठेने, सातत्याने आणि तळागाळात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याच्या कार्याची योग्य दखल घेतली जावी, अशी भावना सध्या भाजपाच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. लातूर शहरातील ज्येष्ठ व अनुभवी कार्यकर्ते श्री. संजयकुमार सुरवसे (सूर्यवंशी) यांनी लातूर महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी आपला विचार व्हावा, अशी नम्र अपेक्षा व्यक्त केली आहे.
सुरवसे हे १९९० सालापासून भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेसाठी समर्पित भावनेने कार्यरत असून, पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी त्यांनी पक्षादेश समजून प्रामाणिकपणे पार पाडली आहे. त्यांनी कधीही पदाची अपेक्षा न ठेवता, कार्यकर्ता म्हणूनच पक्षकार्याला प्राधान्य दिले.
१९९५ मध्ये युती सरकारच्या काळात तत्कालीन पालकमंत्री नामदार जयसिंगराव गायकवाड यांच्या कार्यकाळात त्यांनी विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून शासकीय व राजकीय कामकाजाचा अनुभव घेतला. तसेच पदवीधर मतदारसंघ, नगरपरिषद, महानगरपालिका, विधानसभा व लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षाच्या विजयासाठी सक्रिय सहभाग नोंदवला आहे.
संघटनात्मक पातळीवर त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या छत्रपती शिवाजी महाराज मंडळाचे सलग पाच वर्षे मंडळ सरचिटणीस म्हणून काम पाहिले. ग्रामीण व शहरी भाजपा कार्यकारिणीत विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.
२००५ पासून नगरसेवक निवडून आणण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. २०१७ मध्ये प्रभाग क्रमांक १७ ची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडल्यानंतर, २०२६ च्या महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १६ मध्ये भाजपाचा शतप्रतिशत विजय मिळवून देण्यासाठी त्यांनी दिवस-रात्र परिश्रम घेतले.
यासोबतच राज्यसभा खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांच्यासोबत अनेक वर्षे पक्षकार्य करत त्यांनी दिलेल्या जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत. तालुका स्तरावरही ते निष्ठावान कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहिले आहेत. गावभाग परिसरातील संघाच्या शाखेत स्वयंसेवक म्हणून काम करत संघटन वाढीसाठीही त्यांनी योगदान दिले असून, विविध प्रशिक्षण वर्गांच्या माध्यमातून राष्ट्रीय विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे.
गेल्या ३५ वर्षांच्या या प्रदीर्घ प्रवासात “कार्यकर्ता” हीच आपली ओळख जपत, जनसेवेचे व्रत जोपासणाऱ्या संजयकुमार सुरवसे यांना त्यांच्या अनुभवाचा आणि निष्ठेचा लाभ लातूर शहराच्या विकासासाठी घेण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
लातूर महानगरपालिकेत जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी व पक्षाची ध्येयधोरणे राबवण्यासाठी स्वीकृत नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळावी, अशी नम्र विनंती त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे केली असून, पक्षाचे जागृत नेतृत्व त्यांच्या कार्याची योग्य दखल घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर