शेतकऱ्यांच्या मेहनतीचे रक्षण करणारी कारवाई – स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे सोयाबीन चोरी प्रकरण उघडकीस
तीन आरोपी अटक, ₹1,38,400/- चा मुद्देमाल जप्त.*
लातूर जिल्ह्यातील शेतकरी हा जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांच्या घामातून निर्माण होणारा शेतीमाल चोरीस जाणे ही केवळ आर्थिक हानी नसून त्यांच्या कष्टांवर झालेला अन्याय आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी लातूर पोलीस प्रशासन सदैव सज्ज आहे.
पोलीस अधीक्षक श्री.अमोल तांबे यांनी मालमत्ते विषयक घडणाऱ्या विशेषतः शेतकऱ्यासंदर्भात घडणाऱ्या प्रत्येक गुन्ह्याचा छडा लावणे संदर्भात पोलीस प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने अपर पोलिस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकाने दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी दुपारी 13.00 वाजण्याच्या सुमारास, निलंगा पोलीस स्टेशन हद्दीतील पानचिंचोलीपाटी परिसरात हणुमंतवाडी ते निलंगा जाणाऱ्या रोडवरील मसलगा शेत शिवारात, 4 ते 5 इसम चोरट्या पद्धतीने, संशयितरित्या सोयाबीनचे कट्टे पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहनात भरत आहेत. ही माहिती मिळताच पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस पथकाची चाहूल लागताच संशयित इसम पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र, पथकातील अधिकारी व अमलदारांनी प्रसंगावधान राखत पाठलाग करून तीन इसमांना ताब्यात घेतले. एक इसम मात्र पिकअप वाहन घेऊन पसार होण्यात यशस्वी झाला. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे.
1) दिपक तानाजी पवार, वय 27 वर्षे
2) नवनाथ छगण उर्फ अचित काळे, वय 25 वर्षे,
3) संतोष सखाराम काळे, वय 23 वर्षे (सर्व रा. गोरोबा गल्ली, तेर, ता. जि. धाराशिव)
तपासादरम्यान आरोपींनी कबूल केले की, त्यांनी सुमारे 15 दिवसांपूर्वी खरोसा जवळील शिंदी जवळगा गावातील शेतशिवारातून रात्रीच्या वेळी एकूण 40 कट्टे सोयाबीनची चोरी केली होती. तोच चोरीचा माल लपवून ठेवला होता आणि आज तो पिकअप वाहनाद्वारे इतरत्र हलविण्याच्या तयारीत असताना ते पकडले गेले.
या कारवाईत एकूण ₹1,38,400/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये चोरीचे सोयाबीनचे कट्टे तसेच गुन्ह्यात वापरलेली एम.एच. 25 ए.व्ही. 4427 क्रमांकाची हिरो कंपनीची काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटारसायकल यांचा समावेश आहे. सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पिकअप वाहनासह पसार झालेला आरोपीचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथक रवाना करण्यात आले असून, त्याला लवकरच अटक करण्यात येणार आहे.
ही कारवाई म्हणजे केवळ चोरीचा गुन्हा उघडकीस आणणे नाही, तर शेतकऱ्यांच्या श्रमाचे संरक्षण करणे, गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती निर्माण करणे आणि समाजात सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करणे, हे या कारवाईचे खरे उद्दिष्ट आहे.
लातूर पोलीस प्रशासन सर्व नागरिकांना आवाहन करते की, शेतमाल चोरी, अवैध वाहतूक किंवा कोणत्याही संशयास्पद हालचालीबाबत त्वरित नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. नागरिकांचे सहकार्य, गुप्त माहिती देणाऱ्यांची भूमिका आणि पोलीस दलाची तत्परता या तिन्हींच्या समन्वयातूनच अशा मोठ्या गुन्ह्यांचा पर्दाफाश शक्य होतो.
“गुन्हेगार कितीही चलाख असला, तरी कायद्याच्या कचाट्यातून तो सुटू शकत नाही” हा ठाम संदेश देणारी ही कारवाई असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि समाजाच्या सुरक्षिततेसाठी लातूर पोलीस दल सदैव सज्ज आहे.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील सपोनि सदानंद भुजबळ, पोउपनि राजेश घाडगे, पोलीस अंमलदार नवनाथ हासबे, माधव बिलापटटे, राजेश कंचे, तुराब पठाण, प्रशांत स्वामी, संजय कांबळे, सुर्यकांत कलमे, प्रदीप स्वामी, तुळशीराम बरूरे, पाराजी पुठ्ठेवाड, गणेश साठे, गोविंद भोसले, अंजली गायकवाड, शैलेश सुडे, हरी पतंगे, श्रीनिवास जांभळे यांचा समावेश होता.