बोगस शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मान्यतेप्रकरणी मोठा घोटाळा



दोषींवर 420 चा गुन्हे दाखल करण्याची मागणी – मिलिंदजी कांबळे
      लातूर, दि.५ (प्रतिनिधी) :    श्री व्यंकटेश शिक्षण संस्था, लातूर यांच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या श्री व्यंकटेश माध्यमिक विद्यालयातील बोगस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली मान्यता ही पूर्णतः अनियमित व बेकायदेशीर असल्याचा गंभीर आरोप पत्रकार परिषदेत सामाजिक कार्यकर्ते मिलिंदजी कांबळे यांनी केला आहे.                मान्यताप्राप्त संस्थेचे स्वयंघोषित अध्यक्ष सुरेंद्र ब्रिजमोहन अग्रवाल व स्वयंघोषित सचिव प्रशांत शिवाप्पा पटणे यांच्या स्वाक्षरीने देण्यात आल्याचे समोर आले असून, यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व प्रशासकीय गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मराठवाडा प्रदेश निराधार संघटनेचे अध्यक्ष मा. मिलिंदजी कांबळे यांनी सांगितले की, संबंधित शाळेत कार्यरत असलेल्या काही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या शासन नियमांना धरून नसताना त्यांना मान्यता देण्यात आली आहे. या बनावट मान्यतेच्या आधारे शासनाकडून वेतन व अन्य लाभ घेतले जात असल्याची दाट शक्यता असून, हा प्रकार म्हणजे शासनाची व समाजाची फसवणूक आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करणे आवश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले. यासंदर्भात तात्काळ शिक्षक अधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, लातूर यांनी हस्तक्षेप करून संबंधित प्रकरणाची चौकशी करावी, तसेच तत्कालीन शाळेचे मुख्याध्यापक शासना यांच्यावर भारतीय दंड विधानाच्या कलम 420 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी स्पष्ट मागणी मिलिंदजी कांबळे यांनी केली.
यावेळी त्यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या बोगस नियुक्त्यांमुळे पात्र व गुणवंत उमेदवारांवर अन्याय होत असून शिक्षण व्यवस्थेची प्रतिमा मलिन होत आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
पत्रकार परिषदेत विविध सामाजिक, शैक्षणिक प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली. शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी कठोर निर्णय घेण्याची गरज असून, दोषींना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या पत्रकार परिषदेला विविध माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर