अल्पवयीन मुलीची छेडछाड प्रकरणी आरोपीस सक्तमजुरी


       लातूर, दि. २२: लातूर जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी मा. जिल्हा व सत्र न्यायालय, लातूर यांनी आरोपीस दोषी ठरवत सक्तमजुरी व दंडाची कठोर शिक्षा सुनावली आहे. हा निकाल महिलां व बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
दि. १२ डिसेंबर २०२३ रोजी जि. प. शाळेच्या मैदानात सायकल खेळत असताना आरोपी परमेश्वर ज्ञानोबा माने (वय २७, रा. बोरवटी, ता. जि. लातूर) याने अल्पवयीन मुलीचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. या घटनेनंतर पीडितेच्या आईने लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तपासाअंती आरोपीविरुद्ध भा.दं.वि. व POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
खटल्याच्या सुनावणीनंतर मा. जिल्हा व सत्र न्यायालय-०३, लातूर येथील न्यायालयाने आरोपीस भा.दं.वि. कलम ३५४(ब) सह POCSO कायदा कलम ८ अंतर्गत ३ वर्षे सक्तमजुरी व ३,००० रुपये दंड, तसेच भा.दं.वि. कलम ३५४ सह POCSO कायदा कलम १२ अंतर्गत १ वर्षे सक्तमजुरी व १,००० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
पोलीस प्रशासन व सरकारी अभियोक्त्यांच्या प्रभावी कामगिरीमुळे हा खटला यशस्वी ठरला असून, महिलां व बालकांविरोधातील गुन्ह्यांमध्ये दोषींना कोणतीही सूट नाही, असा स्पष्ट संदेश या निकालातून देण्यात आला आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर