२० वर्षांपूर्वीच्या चोरी प्रकरणातील फरार आरोपी अखेर गजाआड; लातूर पोलिसांच्या विशेष पथकाची यशस्वी कामगिरी

लातूर, दि. २० : लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे तसेच प्रलंबित गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या लातूर पोलिसांनी तब्बल २० वर्षांपूर्वीच्या चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक करून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. दीर्घकाळ न्यायप्रक्रियेला गुंगारा देणाऱ्या आरोपीला शोधून काढत पोलिसांनी न्यायालयासमोर उभे केले आहे.
पोलीस स्टेशन शिवाजीनगर, लातूर येथील गुन्हा रजिस्टर क्रमांक १२६/२००६, भारतीय दंड संहिता कलम ३७९ अन्वये दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी गेली दोन दशके फरार होता. वारंवार वास्तव्य बदलत असल्यामुळे आरोपी पोलिसांच्या हाती लागत नव्हता. त्यामुळे सदर प्रकरण सुप्त संचिकेत ठेवण्यात आले होते. मात्र, लातूर पोलिसांच्या विशेष पथकाने या जुन्या गुन्ह्याचा पुन्हा सखोल पाठपुरावा करत आरोपीचा शोध घेण्याचा निर्धार केला.
दि. १९ जानेवारी २०२६ रोजी अपर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकास गोपनीय माहिती मिळाली की, बाबु लक्ष्मण संकोळे (वय ४१, रा. बुधोडा, ता. औसा, जि. लातूर; सध्या वास्तव्यास याकतपूर रोड, औसा) हा कमालपूर–उजनी शिवारात उसतोडीचे काम करीत आहे. माहितीची खातरजमा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आली. त्यानंतर योग्य नियोजन करून विशेष पथकाने सापळा रचत आरोपीस ताब्यात घेतले व पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे हजर केले.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, फिर्यादी अरविंद विठ्ठलराव भोसले, रा. शाहूपुरी कॉलनी, लातूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि. १० जुलै २००६ रोजी रात्री त्यांच्या घरासमोर उभी असलेल्या अँबेसेडर कार क्रमांक MEQ-1561 मधून पॉईनर कंपनीचा सुमारे ४,००० रुपये किमतीचा कार टेप चोरीस गेला होता. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीस दि. १४ जुलै २००६ रोजी अटक झाली होती; मात्र नंतर तो न्यायालयात अनुपस्थित राहू लागल्याने न्यायालयीन प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले आणि प्रकरण सुप्त संचिकेत गेले.
अखेर २० वर्षांनंतर आरोपीस न्यायालयात हजर करण्यात आले असता, मा. मुख्य न्याय दंडाधिकारी श्री. सतिश एन. पाटील यांनी त्यास दि. २७ जानेवारी २०२६ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी (लातूर शहर) श्री. समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. विशेष पथकातील सपोनि शिवशंकर मनाळे, पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अंमलदार दत्तात्रय शिंदे, योगेश गायकवाड व श्रीकांत कुंभार यांनी ही कारवाई यशस्वी केली.
या कारवाईमुळे कितीही जुना गुन्हा असला तरी आरोपीला शोधून काढून न्यायालयासमोर उभे केले जाईल, असा ठाम संदेश समाजात गेला असून लातूर पोलिसांच्या चिकाटीपूर्ण आणि जबाबदार कार्यपद्धतीचे कौतुक होत आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर