हिंगोली व नांदेडमध्ये अवैध व्यवसायांवर पोलिसांचा मोठा प्रहार७३ लाखांचा मुद्देमाल जप्त, १ कोटी ३ लाखांचा मुद्देमाल नष्ट

हिंगोली व नांदेडमध्ये अवैध व्यवसायांवर पोलिसांचा मोठा प्रहार
७३ लाखांचा मुद्देमाल जप्त, १ कोटी ३ लाखांचा मुद्देमाल नष्ट
    नांदेड, दि.२० (प्रतिनिधी): नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस उपमहानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली व नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण ७३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून १ कोटी ३ लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील वाळूगंज येथे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. तांबळकर व त्यांच्या पथकाने तीन चारचाकी वाहनांवर छापा टाकून १४ लाख ६७ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी १० आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय दंड संहिता व इतर संबंधित कायद्यांतर्गत कारवाई सुरू आहे.
तसेच नांदेड शहरातील इतवारा भागात करण्यात आलेल्या संयुक्त कारवाईत एका गोदामावर छापा टाकून ५८ लाख २६ हजार रुपयांचा गुटखा व २० लाख ५० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. एकूण ७८ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत हस्तगत झाला असून संबंधित आरोपींविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याशिवाय जिल्ह्यातील विविध ठिकाणी केलेल्या कारवायांमध्ये ७२ लाख ९३ हजार रुपयांचा गुटखा व तीन चारचाकी वाहने नष्ट करण्यात आली. एकूण १ कोटी ३ लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या सर्व कारवायांमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. नागरिकांनी अवैध व्यवसायांबाबत माहिती देण्यासाठी पोलिस प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तक्रारदारांनी nandedrange.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर किंवा ९१ ५० १०० १०० या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे पोलिस उपमहानिरीक्षक कार्यालय, नांदेड परिक्षेत्र यांच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर