कु. अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; अतिरिक्त पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांची प्रमुख म्हणून नेमणूक

कु. अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; अतिरिक्त पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांची प्रमुख म्हणून नेमणूक
      लातूर, दि. 17 (प्रतिनिधी) : जवाहर नवोदय विद्यालय, लातूर येथील विद्यार्थिनी कु. अनुष्का पाटोळे यांच्या मृत्यू प्रकरणी दाखल गुन्ह्याच्या तपासाबाबत आजपर्यंत झालेल्या कारवाईची माहिती देण्यासाठी लातूर जिल्हा पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या प्रकरणाचा तपास अधिक प्रभावी, पारदर्शक व जलदगतीने होण्यासाठी नांदेड येथील अतिरिक्त पोलिस अधीक्षक तथा एसआयटी प्रमुख श्रीमती अर्चना पाटील यांची विशेष तपास पथकाच्या (SIT) प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
या संवेदनशील प्रकरणाच्या तपासाला गती देण्यासाठी जिल्हा पोलिस दलातील अनुभवी व वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेले विशेष तपास पथक गठित करण्यात आले आहे. या पथकात वरिष्ठ अधिकारी केंद्रे, सहाय्यक पोलिस निरीक्षक (API) दोरनाचार्य, नरवडे साहेब, समीर साळवे यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी सहभागी आहेत.
पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी सांगितले की, तपासादरम्यान कोणतीही बाब दुर्लक्षित केली जाणार नाही. सर्व संभाव्य बाजूंनी तपास केला जाईल तसेच आवश्यक त्या तांत्रिक व वैद्यकीय अहवालांचा सखोल अभ्यास करण्यात येणार आहे. सत्य बाहेर येण्यासाठी पोलिस प्रशासन कटिबद्ध असून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, या प्रकरणाबाबत समाजात असलेली अस्वस्थता लक्षात घेता तपास प्रक्रियेत पारदर्शकता राखली जाईल आणि तपासाची प्रगती वेळोवेळी माध्यमांद्वारे जाहीर केली जाईल, असेही पोलिस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर