लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद
लातूर : लातूर जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या सार्वत्रिक नियमित निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली.
यावेळी वर्षा ठाकूर घुगे यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततापूर्ण व निर्भय वातावरणात पार पाडण्यात येणार आहे. मतदार यादीचे अंतिमीकरण, उमेदवारी अर्ज दाखल करणे, छाननी, माघार, मतदान व मतमोजणी या सर्व टप्प्यांचे नियोजन प्रशासनाने केले आहे.
निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहिता कडकपणे राबविण्यात येणार असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनासह संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मतदारांनी निर्भयपणे व मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन वर्षा ठाकूर घुगे यांनी केले. तसेच माध्यम प्रतिनिधींनी निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन करून जबाबदार व वस्तुनिष्ठ पत्रकारिता करावी, असेही त्यांनी नमूद केले.
या पत्रकार परिषदेला जिल्हा प्रशासनातील अधिकारी, निवडणूक विभागाचे प्रतिनिधी तसेच विविध माध्यमांचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.