लातूरमध्ये कुख्यात टोळीवर मोठी कारवाई; तिघे दोन वर्षांसाठी हद्दपार
लातूरमध्ये कुख्यात टोळीवर मोठी कारवाई; तिघे दोन वर्षांसाठी हद्दपार
लातूर, दि. १३(प्रतिनिधी): लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने ठोस आणि कडक पावले उचलली आहेत. महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ च्या कलम ५५ अंतर्गत लातूर शहरातील एका कुख्यात गुन्हेगारी टोळीविरुद्ध हद्दपारीची कारवाई करण्यात आली असून, टोळीतील तिघांना दोन वर्षांच्या कालावधीसाठी जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये करण्यात आली आहे.
हद्दपार करण्यात आलेल्या इसमांमध्ये ईश्वर गजेंद्र कांबळे (वय २३), विकास उर्फ विक्की गजेंद्र कांबळे (वय २५) आणि प्रफुल श्रीमंत गायकवाड (वय २९) यांचा समावेश आहे. या तिघांविरुद्ध विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात जबरी चोरी, दरोडा, शस्त्राचा धाक दाखवून लूटमार, धमकी देणे तसेच टोळी बनवून गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
या टोळीच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती व दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. यापूर्वी त्यांच्याविरुद्ध वारंवार प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतरही त्यांच्या वर्तनात सुधारणा न झाल्याने अखेर हद्दपारीसारखी कठोर कारवाई करणे अपरिहार्य ठरले.
विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील व त्यांच्या पथकाने सविस्तर प्रस्ताव तयार करून तो पोलीस अधीक्षकांकडे सादर केला होता. सर्व बाबींचा सखोल विचार करून, आगामी सण-उत्सव, निवडणुका व सार्वजनिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर संभाव्य गुन्हे टाळण्यासाठी सदर टोळीतील सदस्यांना लातूर जिल्ह्यासह नांदेड, धाराशिव व परभणी जिल्ह्यातील काही तालुक्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हद्दपारीच्या कालावधीत संबंधित इसमांना पोलीस अधीक्षकांच्या पूर्वपरवानगीशिवाय हद्दपार क्षेत्रात प्रवेश करता येणार नाही. तसेच त्यांनी आपला निवासाचा पत्ता नजीकच्या पोलीस ठाण्यास कळविणे आणि दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी हजेरी देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या कारवाईमुळे लातूर शहरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, गुन्हेगारी प्रवृत्तीविरुद्ध पोलिसांचा कठोर संदेश स्पष्ट झाला आहे. समाजविघातक प्रवृत्तीविरुद्ध अशीच ठोस व प्रभावी कारवाई पुढेही सुरू राहील, असा इशारा लातूर पोलिसांनी दिला आहे.