जयपूरमध्ये पार पडलेल्या ग्रँड फायनलमध्ये रनर-अपचा बहुमान; महाराष्ट्राचे केले प्रभावी प्रतिनिधित्व
लातूर, दि. २३(प्रतिनिधी) : जयपूर येथील झी स्टुडिओमध्ये दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी पार पडलेल्या ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया (FSIA) 2025’ या राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित सौंदर्य व व्यक्तिमत्त्व स्पर्धेत लातूरची कन्या शिवानी हिने उल्लेखनीय यश संपादन करत रनर-अप (द्वितीय क्रमांक) हा मान पटकावला. तिच्या या घवघवीत यशामुळे संपूर्ण लातूर जिल्ह्यासह महाराष्ट्राचा नावलौकिक देशपातळीवर झाला आहे.
या भव्य ग्रँड फायनलमध्ये देशभरातील विविध राज्यांतून निवड झालेल्या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्या सर्वांमध्ये आपली वेगळी छाप पाडत शिवानीने महाराष्ट्र राज्याचे प्रभावी प्रतिनिधित्व केले. आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण, व्यक्तिमत्त्वातील प्रगल्भता आणि भारतीय संस्कृतीचे सुसंस्कृत दर्शन घडवत तिने परीक्षकांची विशेष दाद मिळवली.
शिवानी ही VDGMC (विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय), लातूर येथे एमबीबीएस अंतिम वर्षाची विद्यार्थिनी असून, वैद्यकीय शिक्षणासोबतच कला, संस्कृती व मंचावरील सादरीकरणात ती सातत्याने चमकत आहे. ती भरतनाट्यम विशारद असून अनेक महाविद्यालयीन, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये यशस्वी सूत्रसंचालनाचा अनुभव तिच्या गाठीशी आहे.
या आधी शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस लातूर 2025’ हा मान पटकावून राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी आपला मार्ग पक्का केला होता. त्या अनुभवाच्या जोरावर तिने ग्रँड फायनलमधील विविध फेऱ्यांमध्ये –
आत्मविश्वास
मंचावरील वावर
संवाद कौशल्य
व्यक्तिमत्त्व विकास
आणि भारतीय परंपरा व आधुनिकतेचा समतोल
या सर्व बाबींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आपली गुणवत्ता सिद्ध केली.
ग्रँड फायनलदरम्यान महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा, स्त्रीशक्ती आणि आधुनिक विचारसरणी यांचा सुंदर संगम शिवानीने राष्ट्रीय मंचावर प्रभावीपणे सादर केला. तिच्या सादरीकरणाचे परीक्षकांसह उपस्थित मान्यवरांनीही विशेष कौतुक केले.
या यशाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवानी म्हणाली,
“माझ्या या यशामागे माझे कुटुंबीय, मार्गदर्शक, प्राध्यापक, मित्रपरिवार आणि लातूरकरांचा मोलाचा पाठिंबा आहे. हे यश सर्व तरुण मुलींना मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची प्रेरणा देईल,” असे भावनिक उद्गार तिने काढले.
शिवानीच्या या उज्ज्वल यशाबद्दल लातूर शहर व जिल्ह्यातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, वैद्यकीय क्षेत्रासोबतच सौंदर्य, कला आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या क्षेत्रातही लातूरच्या मुली देशपातळीवर आपला ठसा उमटवत आहेत, याचे हे जिवंत उदाहरण ठरत आहे.