प्रभाग क्रमांक ३ मधून बंडू दगडू उपाडे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल



         लातूर, दि.३१(प्रतिनिधी): लातूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक–२०२५ साठी प्रभाग क्रमांक ३ मधून बंडू दगडू उपाडे यांनी आज अधिकृतपणे अपक्ष उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करण्यात आला.
        उमेदवारी अर्ज दाखल करताना परिसरातील नागरिक, समर्थक व सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती दिसून आली. यावेळी बहुजन रक्षक सेनेचे अध्यक्ष परमेश्वर वाघमारे, अजय जाधव, चिकटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी बंडू उपाडे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
        बंडू दगडू उपाडे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असून, प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, ड्रेनेज, गोरगरिबांचे प्रश्न तसेच युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नांबाबत त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठीच आपण निवडणूक रिंगणात उतरलो असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
“महानगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील दरी कमी करून नागरिकांना थेट न्याय देण्याचा माझा प्रयत्न राहील. प्रभागातील प्रत्येक समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे,” असे मत बंडू उपाडे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर व्यक्त केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनीही बंडू उपाडे यांच्या सामाजिक कार्याचा उल्लेख करत, प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिकांना एक प्रामाणिक, निर्भीड आणि जनतेतून उभा राहिलेला उमेदवार मिळत असल्याचे मत व्यक्त केले. आगामी निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून बंडू उपाडे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३ मध्ये निवडणूक वातावरण तापू लागले असून, विविध पक्षांसह अपक्ष उमेदवारांमुळे लढत रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर