राजर्षी शाह महाविद्यालयाशी सामंजस्य करार; शैक्षणिक, संशोधन व प्रशिक्षण क्षेत्रात सहकार्य वाढणार
निलंगा, दि. १४ (प्रतिनिधी) : येथील महाराष्ट्र महाविद्यालय आणि लातूर येथील राजर्षी शाह महाविद्यालय (स्वायत्त) यांच्यात शैक्षणिक सहकार्य वाढविण्याच्या उद्देशाने शुक्रवारी अधिकृत सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला. या करारामुळे दोन्ही महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक, संशोधनात्मक तसेच सहअभ्यासक्रमात्मक उपक्रमांना नवे बळ मिळणार आहे.
या सामंजस्य करारावर महाराष्ट्र महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे विद्या परिषद सदस्य डॉ. कर्मवीर कदम आणि राजर्षी शाह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गळगणे यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी राजर्षी शाह महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सदाशिव शिंदे तसेच महाराष्ट्र महाविद्यालयाचे डॉ. गोपाळ मोघे यांची उपस्थिती होती.
या कराराअंतर्गत दोन्ही शैक्षणिक संस्थांमध्ये विविध विकासात्मक उपक्रम राबविण्यावर एकमत झाले आहे. अभ्यासोत्तर व अभ्यासपूरक उपक्रमांचे आयोजन, क्रीडा प्रशिक्षण शिबिरे, संयुक्त अभ्यास मंडळांची स्थापना, शैक्षणिक व संशोधनात्मक माहितीचे आदान-प्रदान, विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम, उद्बोधन वर्ग, वैद्यकीय तपासणी शिबिरे तसेच फिटनेस कॅम्प यांसारख्या उपक्रमांचा समावेश या करारात करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे, संशोधन वृत्ती वाढविणे तसेच प्राध्यापकांच्या व्यावसायिक क्षमतेत भर घालणे हा या सामंजस्य कराराचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दोन्ही महाविद्यालयांच्या संयुक्त प्रयत्नातून गुणवत्तापूर्ण शिक्षण, नवोपक्रम आणि सामाजिक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविता येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
सामंजस्य कराराच्या प्रसंगी महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यांनी या उपक्रमामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना नव्या संधी उपलब्ध होतील तसेच शिक्षणाच्या दर्जात सकारात्मक बदल घडून येईल, असा आशावाद व्यक्त केला.
या सामंजस्य करारामुळे दोन्ही महाविद्यालयांमधील शैक्षणिक सहकार्य अधिक दृढ होऊन भविष्यात विविध संयुक्त उपक्रम, कार्यशाळा आणि संशोधन प्रकल्प प्रभावीपणे राबविले जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.