मुख्यमंत्री निवासस्थानी पुरस्कार परत करणार : अँड.वैजनाथराव वाघमारे यांचा सरकारला इशारा

          लातूर, दि. १० (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित व्यक्तींना वृद्धापकाळात सुसह्य आयुष्य जगता यावे, यासाठी विशेष सवलतींच्या मागण्या करण्यात आल्या असून, त्या मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास स्वतःला मिळालेले पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी परत करणार असल्याचा कडक इशारा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त महासंघाचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष अँड. वैजनाथजी वाघमारे यांनी दिला. लातूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

◼︎ पुरस्कारप्राप्त व्यक्तींना मासिक मानधनाची मागणी

पत्रकार परिषदेत बोलताना अँड. वाघमारे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहिर डॉ. अण्णाभाऊ साठे पुरस्कार, संत रोहिदास महाराज पुरस्कार, मुंदडा आदिवासी पुरस्कार आदी सर्व पुरस्कार प्राप्त व्यक्तींना स्वातंत्र्यसैनिकांप्रमाणे दरमहा ₹१५,००० पेन्शन (मानधन) देण्यात यावे. वृद्धापकाळात या व्यक्तींनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाला मान देत, त्यांनी उर्वरित आयुष्य निर्वेध जगावे, ही आमची प्रमुख मागणी आहे.

तसेच, पुरस्कार प्राप्त व्यक्ती निधन पावल्यास त्यांची पेन्शन त्यांच्या वारस पत्नीस मिळावी, अशी मागणी महासंघाकडून करण्यात आली.

◼︎ एसटीच्या सर्व बसमध्ये मोफत प्रवास

पुरस्कारप्राप्त व्यक्ती व त्यांच्या सोबतीला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आराम, निमआराम, शिवशाही, ई-शिवनेरी, शिवाई, स्लीपर कोच, इलेक्ट्रॉनिक बस अशा सर्व प्रकारच्या बसेसमध्ये मोफत प्रवास सुविधा देण्यात यावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

◼︎ विशेष कार्यकारी अधिकारी दर्जा व मंत्रालयात प्रवेश

पुरस्कारप्राप्त व्यक्तींना विशेष कार्यकारी अधिकारी (Special Executive Officer) म्हणून मान्यता देण्यात यावी. तसेच, महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयात त्यांच्या कामांसाठी तात्काळ प्रवेश मिळावा, अशी मागणीही महासंघाने केली.

◼︎ मागण्या मान्य न झाल्यास पुरस्कार परत

सरकारकडून या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास मोठा निर्णय घेत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पुरस्कार परत करण्याची तयारी असल्याचा इशारा अँड. वाघमारे यांनी स्पष्ट शब्दांत दिला. “आम्हाला मिळालेले सन्मान जर आमच्या जगण्यास उपयोगी नाहीत, तर ते परत करण्यावाचून आमच्याकडे पर्याय नाही,” असे ते म्हणाले.

◼︎ १३ डिसेंबरला नागपुर विधानभवनावर मोर्चा

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शनिवार, दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता यशवंत स्टेडियम टी-पॉईंट, नागपूर येथून विधानभवनावर मोर्चा निघणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. नागपूर अधिवेशनात आपले प्रश्न सरकारपुढे ठामपणे मांडण्यासाठी राज्यभरातील सर्व पुरस्कारप्राप्त व्यक्तींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अँड. वाघमारे यांनी केले.

◼︎ मान्यवरांची उपस्थिती

या पत्रकार परिषदेस राज्याध्यक्ष नामदेवराव चांदणे, शेषेराव करखेलीकर, लक्ष्मणराव तिकटे, शामराव सूर्यवंशी, अॅड. अंगद गायकवाड, प्रभुदास तायडे, केशव कांबळे, भुजंग कांबळे, डॉ. व्यंकटराव शिंदे, चंद्रकांत वाघमारे, नागनाथ कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर