एक व्यक्ती एक मत आणि एकच मूल्य ही बाबासाहेबांचीच देणगी : केशव कांबळे



    लातूर, दि.०६ (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वैषाली बुद्धविहार, बौद्धनगर लातूर  येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपासक–उपासिकांनी तथागत भगवान बुद्ध व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी बोलताना केशव कांबळे म्हणाले की, “एक व्यक्ती – एक मत आणि एकच मूल्य” ही जगाला मार्गदर्शक ठरलेली लोकशाही संकल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीयांना दिलेली ऐतिहासिक देणगी आहे.
भारत धर्माधिष्ठित जातीय व्यवस्थेने ग्रासलेला असताना, प्रत्येक नागरिकाला समान मताधिकार नाकारला जात होता. काहीच विशिष्ट वर्गाला मतदानाचा अधिकार असलेल्या काळात २३ डिसेंबर १९१९ रोजी साऊथ ब्युरो आयोगासमोर बाबासाहेबांनी दिलेली साक्ष ही भारतीय लोकशाहीतील क्रांतिकारी पायाभरणी असल्याचे ते म्हणाले.
कांबळे पुढे म्हणाले की, भारतीय समाजातील ब्राह्मण, ब्राह्मणेतर, हिंदू आणि अस्पृश्य या घटकांतील तीव्र विषमता दूर करण्यासाठी संपत्ती–शिक्षणाचे निकष काढून टाकून सर्व भारतीय स्त्री–पुरुषांना समान आणि सार्वत्रिक मतदानाचा अधिकार द्यावा, अशी ठाम मागणी बाबासाहेबांनी केली.
त्यानंतर १९२८ मध्ये सायमन कमिशनसमोर आणि नंतर गोलमेज परिषदेतही बाबासाहेबांनी सार्वत्रिक प्रौढ मताधिकारासाठी सातत्यपूर्ण लढा दिला. ब्रिटिश सरकार, काँग्रेस, उच्चवर्णीय हिंदू आणि मुस्लिम लीग सर्व शक्तींशी एकाच वेळी झुंज देत, बाबासाहेबांनी भारतीयांना समान मतदानाचा हक्क मिळवून देण्यासाठी अपार संघर्ष केला.
भारतीय राज्यघटना तयार करताना “आम्ही भारताचे लोक” या शब्दांतून सर्व भारतीयांना समान मताचा अधिकार देऊन ही लोकशाही खऱ्या अर्थाने लोकांची बनवली, असे कांबळेंनी सांगितले.
शेवटी त्यांनी आवाहन केले की,
“प्रत्येक नागरिकाने आपल्या मताची किंमत ओळखून मतदानाचा हक्क बजवावा. मी भारताचा नागरिक आहे. या ओळखीचे रक्षण मताच्या माध्यमातूनच होते.”
कार्यक्रमाला समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर