दयानंद शिक्षण संस्थेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तब्बल २१ लाखांची मदत – पूरग्रस्तांना दिलासा
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांच्याकडे सुपूर्द, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडून एक दिवसाचे वेतन
ज्ञलातूर, दि. २८(प्रतिनिधी) : राज्यातील विविध भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानीची दखल घेत दयानंद शिक्षण संस्थेने सामाजिक जाणिवेतून पुढाकार घेत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तब्बल २१ लाख रुपये जमा केले आहेत. संस्थेच्या या उपक्रमाचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी यांनी ही मदत जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. संस्थेअंतर्गत कार्यरत सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी एक दिवसाचे वेतन देऊन ही मदत उभारण्यात महत्वपूर्ण योगदान दिले. त्यापैकी १४ लाख २२ हजार ६४६ रुपये हे शिक्षक व कर्मचाऱ्यांकडून जमा झाले, तर संस्थेने स्वतंत्रपणे ६ लाख ७७ हजार ३५४ रुपये दिल्याने एकूण रक्कम २१ लाख रुपये झाली.
या मदत वितरणाच्या वेळी संस्थेचे सहसचिव विशाल लाहोटी, सहाय्यक सचिव अजिंक्य सोनवणे, कोषाध्यक्ष संजय बोरा, शैक्षणिक विकास अधिकारी डॉ. जय प्रकाश दरगड, तसेच दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांच्या उपस्थितीत धनादेश देण्यात आला.
दयानंद शिक्षण संस्था १९६९ पासून लातूर व मराठवाड्यात शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर मानली जाते. सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत संस्था नेहमीच मदतीसाठी पुढाकार घेत आली आहे. पुरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस जमा केलेली ही रक्कम संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचे प्रतीक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.
पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी ही मदत मोलाची ठरेल, असे सांगत संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी यांनी सर्व शिक्षक-कर्मचाऱ्यांचे आभार मानले. संस्थेच्या पुढाकारामुळे इतर संस्थांनीही अशा सामाजिक कार्यात पुढे यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
— समाप्त —