मालमत्ता कर भरा; ३० नोव्हेंबरला विशेष कर वसुली शिबीर – थकबाकीदारांना ८० टक्के दंड माफीची संधी
लातूर, दि. २८ (प्रतिनिधी) : शहर महानगरपालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने नागरिकांना दिलासा देत पुन्हा एकदा मोठी शास्ती माफी जाहीर केली आहे. आयुक्त व प्रशासक मनीषी मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपआयुक्त (कर संकलन) डॉ. पंड्या खानसोल यांच्या नियोजनानुसार रविवार, ३० नोव्हेंबर रोजी महानगरपालिका मुख्यालयात विशेष कर वसुली शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात आपली थकित मालमत्ता कर रक्कम भरणाऱ्यांना दंडातील तब्बल ८० टक्के सूट मिळणार आहे. थकबाकीदारांना कर भरण्यास प्रवृत्त करण्यासाठी ही विशेष सवलत यावर्षीचे शेवटचे शिबीर मानले जात आहे. नियमित कर भरणाऱ्यांचे प्रोत्साहन तसेच दंड माफीचा लाभ थकबाकीदारांनाही देण्यासाठी प्रशासनाकडून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून महानगरपालिकेने टप्प्याटप्प्याने शास्ती माफी योजना लागू केली होती, मात्र काही थकबाकीदारांकडून कमी प्रतिसाद मिळत असल्याने आता प्रशासनाने अधिक कडक भूमिका घेतली आहे. ३० नोव्हेंबरच्या शिबिरानंतर थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्याची तयारी महापालिकेने पूर्ण केली असून, थेट वसुली मोहिम राबवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याबाबत कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, नियमित करण्याची संधी देण्याचा प्रयत्न म्हणून हे शिबीर आयोजित करण्यात आले असून, थकबाकीदारांनी संधीचा लाभ घ्यावा. दंड माफी ही केवळ शिबिराच्या दिवशीच लागू असेल आणि थकबाकीदारांनी जागेवरच बिल तपासून कर भरावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
विशेष कर वसुली शिबीर – वेळ व ठिकाण
- रविवार, ३० नोव्हेंबर
- सकाळी १० ते सायंकाळी ५
- महानगरपालिका मुख्यालय, लातूर
शहरातील सर्व थकबाकीदारांनी आपली मालमत्ता कराची थकबाकी त्वरित भागवून शास्ती माफ करण्याची ही सुवर्णसंधी गमवू नये, असे आवाहन उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे यांनी केले आहे.