‘जागृती शुगर’च्या वतीने ऊसतोड मजुरांसाठी मोफत आरोग्य शिबिर संपन्न
देवणी तालुक्यातील तळेगाव (भो.) येथील शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
लातूर, दि. २८(प्रतिनिधी) : देवणी तालुक्यातील तळेगाव (भो.) परिसरात कार्यरत असलेल्या साखर कारखान्यांतील हंगामी उसतोड मजुरांच्या आरोग्याची काळजी घेत ‘जागृती शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड’ आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले. हंगामाच्या काळात आरोग्याच्या विविध तक्रारींना सामोरे जाणाऱ्या मजुरांसाठी हे शिबिर मोठा दिलासा ठरले.
या शिबिराचे उद्घाटन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते यांच्या उपस्थितीत झाले. त्यांच्यासोबत डॉ. दीपाली शिंदे, डॉ. स्वप्निल एकबोटे, डॉ. तान्या जाधव, कारखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्याम हिंगणे, जनरल मॅनेजर गणेश वळवे, मुख्य शेती अधिकारी रामानंद कदम तसेच प्रमुख अभ्यागत म्हणून अतुल दरेंकर, मुख्य रसायन तज्ज्ञ ज्ञानेश्वर जाधव, आसवनी इंजि. विलास पाटील, उस पुरवठा अधिकारी लक्ष्मण बिरादार, रामदास सोलूंखे, शेतकरी अधिकारी राजकुमार कांबळे आणि कृषी पर्यवेक्षक महेश भंडे उपस्थित होते.
शिबिरात विविध तपासण्या – मोठा प्रतिसाद
उस्तोड मजुरांसाठी खास राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला. उसतोड मजुरांची कारखाना स्थळी व प्रत्यक्ष उसतोडणी सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन फिल्डवरच तपासणी करण्यात आली. यामध्ये रक्तदाब, रक्तशर्करा, हिमोग्लोबिन, सर्वसाधारण आरोग्य तपासणी, डोळ्यांची तपासणी, त्वचारोग आणि तापासंबंधी तपासण्या घेण्यात आल्या. सर्दी, खोकला, अंगदुखी, कंबरदुखी, त्वचारोग तसेच हंगामी आजारांवर त्वरित औषधे वाटप करण्यात आले.
लसीकरण आणि औषधवाटप
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या सहकार्याने आवश्यक लसीकरणही करण्यात आले. हंगामी आजारांपासून बचावासाठी मजुरांना जागरूक करण्यावर विशेष भर देण्यात आला. अनेक मजुरांना मोफत जनरल औषधे, जीवनसत्वे आणि प्राथमिक उपचार संच देण्यात आले.
महिलांसाठी विशेष उपक्रम
कारखान्याच्या वतीने महिलांसाठी स्वतंत्रपणे आरोग्य तपासणी व मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. महिलांना सॅनिटरी नॅपकिनचे मोफत वितरण करून स्वच्छतेविषयी आवश्यक माहिती देण्यात आली. महिलांच्या आरोग्यविषयक तक्रारींची नोंद घेऊन त्यांना योग्य उपचार व पुढील मार्गदर्शन करण्यात आले.
आरोग्य जनजागृती आणि मार्गदर्शन
शिबिरादरम्यान आरोग्य तज्ञांनी मजुरांशी संवाद साधत हंगामी आजारांपासून बचाव, स्वच्छतेचे महत्त्व, पोषणयुक्त आहार, सतत पाणी पिण्याची सवय, तसेच कडक उन्हात काम करताना घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कारखान्याच्या वतीने मजुरांच्या कामकाजाच्या ठिकाणी मूलभूत सुविधा वाढविण्याचेही आश्वासन देण्यात आले.
या शिबिरामुळे तब्बल शेकडो उसतोड मजुरांना मोठा फायदा झाला असून ‘जागृती शुगर’ने सामाजिक बांधिलकी जपत मजुरांच्या आरोग्याला दिलेला प्राधान्यक्रम कौतुकास्पद असल्याचे स्थानिकांनी सांगितले. भविष्यातही अशाच प्रकारचे उपक्रम राबवून मजुरांच्या आरोग्याची सतत काळजी घेण्याचा निर्धार कारखान्याच्या व्यवस्थापनाकडून व्यक्त करण्यात आला.