लातूरमध्ये आठवी अखिल भारतीय बौद्ध धम्मपरिषद

    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची नवचेतना

      लातूर, दि. १७ (प्रतिनिधी) : बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट, लातूर यांच्या पुढाकाराने आयोजित आठवी अखिल भारतीय बौद्ध धम्मपरिषद गुरुवार, दि. २५ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २.०० वा. महाविहार, धम्म केंद्र सातकर्णी नगर बार्शी रोड, रामेगाव, जिल्हा लातूर येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे, अशी माहिती भिक्खू डॉ. उपगुप्त महाथेरो यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

   परिषदेसाठी देशभरातील अनुयायी, भिक्षू, प्रबोधन करू इच्छिणारे समाज कार्यकर्ते तसेच विविध राज्यांतील बौद्ध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

या परिषदेच्या निमित्ताने प्रसिद्ध केलेल्या प्रेसनोट मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेल्या मानवतावादी बौद्ध विचारसरणीचे महत्व अधोरेखित करण्यात आले आहे. भारत हे बौद्धधम्माच्या जन्मभूमीचे राष्ट्र असून, डॉ. आंबेडकरांच्या प्रबोधनामुळे बौद्धधम्माचा प्रसार पुन्हा राष्ट्रभर वाढू लागल्याचे नमूद करण्यात आले. समाजातील विषमता, अन्याय, असमानता, अंधश्रद्धा, भीती यावर मात करण्यासाठी बौद्ध धम्म हेच मानवतावादी मार्ग असल्याचे परिषदेच्या आयोजकांनी स्पष्ट केले.

प्रेसनोटनुसार, आधुनिक भारत समृद्ध, प्रगत, शांततामय आणि बंधुत्वाच्या नात्याने जोडलेल्या सामाजिक संरचनेची उभारणी करत आहे. या प्रक्रियेत बौद्धधम्मातील सम्यक दृष्टि, करुणा, मैत्री, प्रज्ञा, नैतिक मूल्ये, समानता, वैज्ञानिक दृष्टी या तत्त्वांची देशाला अत्यंत गरज असल्याचे अधोरेखित करण्यात आले. राष्ट्रनिर्माणात या मूल्यांचा मोठा वाटा असून, डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या धम्मचक्र प्रवर्तनाच्या विचारांना आजच्या काळातही मोठे महत्व आहे.

बौद्धधर्माच्या मूलभूत शिकवणी — चार आर्यसत्ये, अष्टांगिक मार्ग, पंचशील, दान, करुणा, प्रज्ञा, मैत्री, विशुद्ध जीवनशैली — या माध्यमातून समाजातील तणाव, हिंसा, वैमनस्य व विषमता कमी करण्याची क्षमता असल्याचे नमूद करण्यात आले. आधुनिक जग भोगत असलेल्या मानसिक ताणतणावाच्या समस्यांवर बौद्ध शिकवणी प्रभावी उपाय असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले.

प्रेसनोटमध्ये हेही नमूद करण्यात आले की, भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी, देशाचे संविधाननिर्माते डॉ. आंबेडकर तसेच जगातील अनेक विचारवंतांनी बौद्धधम्माला शांतीचा मार्ग म्हणून स्वीकारले. आजच्या युगात वैज्ञानिक दृष्टीकोन, नैतिकता आणि समानतेवर आधारित धर्माची गरज असून, बौद्धधम्म हा त्याचा सक्षम मार्ग आहे.

परिषदेचे अध्यक्ष डॉ. उपयथ महाविरे यांनी सांगितले की, "आपल्या राष्ट्राच्या विकासात बौद्ध मूल्यासारखी शांतता, बंधुत्व, समता आणि तर्कशुद्ध विचारांची आवश्यकता आहे. तरुण पिढीने बौद्ध मूल्ये आत्मसात केली तर भारत जगासमोर मानवीयतेचा आदर्श ठेवू शकतो."

या परिषदेच्या माध्यमातून बौद्धधर्मातील मौलिक विचार, सामाजिक परिवर्तनात बौद्धधर्माची भूमिका, धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे महत्त्व, नवयान बौद्धधर्माचे योगदान, तसेच डॉ. आंबेडकरांच्या धम्मदर्शनावर प्रबोधनपर व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत. विशेषतः युवक आणि महिलांसाठी मार्गदर्शन सत्रे ठेवण्यात आली आहेत.

कार्यक्रमात देशभरातील भिक्षू संघ, धम्मकार्यकर्ते, विविध बौद्ध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून, लातूरमध्ये बौद्धधम्मविषयी जनजागृती, अध्ययन व संशोधन यास नवसंजीवनी मिळणार आहे. परिषदेच्या यशस्वीतेसाठी महाविहार लातूरच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर