पंढरपूर | राज्यस्तरीय शिखर अधिवेशनासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ सज्ज, आज सायंकाळी रवाना झाले
लातूर जिल्ह्यातील प्रतिनिधींचा उत्साही सहभाग
लातूर, दि. १४ (प्रतिनिधी): ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्य शिखर अधिवेशनाचे औचित्य साधत पंढरपूर शहर पुन्हा एकदा दशकातील महत्त्वाच्या मीडिया समारंभाचा साक्षीदार ठरणार आहे. संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली १५ आणि १६ नोव्हेंबर २०२५ रोजी हे अधिवेशन पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार भव्य स्वरूपात पार पडणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष व जिल्हा अध्यक्ष, तसेच सदस्य सहभागी होत आहे.
अलीकडील निवडणूक प्रक्रियेचा या अधिवेशनाशी कोणताही संबंध नसून कार्यक्रमात कुठलाही बदल होणार नसल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पत्रकारिता, डिजिटल मीडिया, प्रसारमाध्यमांचे आधुनिक स्वरूप आणि नवीन तंत्रज्ञान या सर्वांवर आधारित चर्चासत्रे, मार्गदर्शन सत्रे आणि विशेष मान्यवरांचे व्याख्यान यांचा तसाच प्रभावी आणि विस्तृत कार्यक्रम होणार आहे.
या वर्षीचे अधिवेशन मागील वेळीपेक्षा अधिक भव्य, प्रभावी आणि संस्मरणीय व्हावे यासाठी संघटनेने मोठ्या उत्साहात तयारी केली आहे. देश-विदेशातील मान्यवर, मीडिया क्षेत्रातील तज्ज्ञ, उद्योगमान्य वक्ते तसेच राज्यभरातील प्रतिनिधी पंढरपूरमध्ये उपस्थित राहणार आहेत. सर्व आमंत्रित गेस्ट आपल्या ठरलेल्या वेळेत अधिवेशनात सहभागी होणार असल्याचेही संस्थेने जाहीर केले आहे.
दरम्यान, लातूर जिल्ह्यातील व्हॉईस ऑफ मीडिया प्रतिनिधी अधिवेशनासाठी पंढरपूरकडे रवाना झाले असून या उत्सवाला लातूरची उपस्थिती लक्षणीय राहणार आहे. जिल्ह्यातील पत्रकार, डिजिटल क्रिएटर्स, मीडिया स्वयंसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा या दोन दिवसीय अधिवेशनात सक्रिय सहभाग अपेक्षित आहे.
संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी सर्व सदस्यांना उत्साह, संपर्क आणि सहभाग कायम ठेवण्याचे आवाहन करत मीडिया क्षेत्राला नवीन दिशा देण्याच्या दृष्टीने हे अधिवेशन महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
पंढरपूरच्या पारंपरिक सांस्कृतिक व पवित्र भूमीत मीडिया क्षेत्रातील चर्चांचा त्रिवेणी संगम घडवणारे हे राज्यस्तरीय अधिवेशन पत्रकारितेला नवी उंची देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.