सेवेतून निवृत्तीला आदर्श निरोप : सौ. शोभा शेषेराव गायकवाड (करखेलीकर) यांचा सत्कार समारंभ उत्साहात
उदगीर, (प्रतिनिधी) : दि. 11 नोव्हेंबर 2025 रोजी पंचायत समिती उदगीर येथे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या आंगणवाडी पर्यवेक्षिका सौ. शोभा शेषेराव गायकवाड (करखेलीकर) यांचा सेवानिवृत्ती निमित्त सेवापूर्ती निरोप समारंभ अत्यंत उत्साहात आणि स्नेहपूर्ण वातावरणात पार पडला.
सौ. गायकवाड यांनी आपल्या दीर्घ सेवाकाळात आंगणवाडी कार्यात आदर्शवत कार्य केले असून, बालविकास, मातृ आरोग्य, पोषण योजना आणि बालशिक्षण क्षेत्रात त्यांनी दाखविलेल्या कार्यक्षमतेमुळे जिल्हास्तरावरही त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या या उल्लेखनीय सेवेसाठी त्यांना “जिल्ह्यातील उत्कृष्ट आंगणवाडी कार्य” म्हणून गौरवाचे प्रशस्तीपत्र देण्यात आले.
हा सन्मान सोहळा मा. श्री. जावेद शेख, मुख्य कार्यक्रम अधिकारी (म.बा.क.) तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद लातूर, श्री. नरेंद्र मेडेवार, गटविकास अधिकारी, पंचायत समिती उदगीर, तसेच मा. श्री. राजेश गजलवाड, बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या हस्ते पार पडला. मान्यवरांच्या हस्ते सौ. गायकवाड यांना प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सौ. गायकवाड यांच्या सेवाकार्यातील समर्पण, कार्यनिष्ठा आणि समाजाभिमुख वृत्तीचे कौतुक केले. त्यांनी ग्रामीण भागातील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेले योगदान अनुकरणीय असल्याचे गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमाला आंगणवाडी पर्यवेक्षिका श्री. शुभांगी कसादे, श्री. टोपरपे, श्री. निडेबणे, तसेच सांख्यिकी अधिकारी श्री. कंठे, श्री. चंदापूरे आणि श्री. कलशेट्टी (सांख्यिकी विस्तार अधिकारी) यांच्यासह सर्व आंगणवाडी सेविका व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी सौ. शोभा गायकवाड यांनी आपल्या सेवाकाळातील अनुभव, सहकाऱ्यांचे सहकार्य आणि प्रशासनाकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी आंगणवाडी सेविकांनी एकजुटीने कार्य करून समाजातील बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहपूर्ण वातावरणात पार पडले. उपस्थित सर्व सहकाऱ्यांनी त्यांना भावनिक निरोप देत त्यांच्या भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.