कोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे ‘खुला आरोग्य संवाद’ : आज सयाजी हॉटेल येथे
कोल्हापूर, दि. २ (प्रतिनिधी): भारतीय वैद्यकीय संघटना (IMA) शाखा कोल्हापूर आणि कोल्हापूर मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने “डॉक्टर आणि श्रोत्यांमध्ये खुला आरोग्य संवाद” हा विशेष कार्यक्रम येत्या २ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत हॉटेल सयाजी, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
या संवाद सत्रात देशातील तीन नामवंत व्यक्तीमत्वे उपस्थित राहून आरोग्य, आहार, मधुमेह, हृदयविकार आणि मानसिक-शारीरिक स्वास्थ या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. या चर्चासत्रात योगी डॉ. संप्रसाद विनोद (अध्यात्म गुरु, पुणे), डॉ. जगन्नाथ दीक्षित (डायबेटिक रिव्हर्सल स्पेशालिस्ट, पुणे) आणि डॉ. आय. बी. विजया लक्ष्मी (प्रो. इमीरिटस, कार्डिओलॉजिस्ट, बंगळुरू) हे प्रमुख वक्ते म्हणून सहभागी होत आहेत.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हा “खुला आरोग्य संवाद” सर्वसामान्य जनतेसाठी खुला असून, प्रवेश मोफत ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना थेट डॉक्टरांशी संवाद साधून आरोग्यविषयक शंका निरसन करण्याची ही एक उत्तम संधी मिळणार आहे.
कार्यक्रमात आरोग्यपूर्ण जीवनशैली, संतुलित आहार, मधुमेह नियंत्रण, हृदयविकाराचे प्रतिबंध, तसेच मानसिक शांततेसाठी अध्यात्मिक दृष्टिकोन अशा विविध विषयांवर चर्चा होणार आहे. ‘आरोग्य आणि स्व-स्थ-ता’ या विषयावर परस्पर संवादात्मक पद्धतीने हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष आणि संयोजक मंडळाने नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
कार्यक्रमाचे ठिकाण: हॉटेल सयाजी, मेघमल्हार हॉल, कोल्हापूर
दिनांक: २ नोव्हेंबर २०२५
वेळ: सायं. ४ ते ६
प्रवेश: मोफत
या संवादातून आरोग्याबाबत वैज्ञानिक तसेच अध्यात्मिक दृष्टिकोन मिळवण्याची सुवर्णसंधी कोल्हापूरकरांना लाभणार आहे.