आयुष्यमान व्यसनमुक्ती केंद्रात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी
लातूर, दि. ३१ (प्रतिनिधी): आयुष्यमान व्यसनमुक्ती केंद्रात भारताचे लोहपुरुष, एकीचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहात व आदरपूर्वक साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चंद्रकांत (दादा) वाघमारे (समाज भूषण पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते) यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून संजय (भाऊ) सुरवसे (सामाजिक कार्यकर्ते), सोपान (काका) कांबळे व निर्मलाताई कांबळे (मंडळ अध्यक्षा) यांच्या प्रमुख उपस्थितीने कार्यक्रमाला उत्साही वातावरण लाभले.
विचारमंचावर आयुष्यमान व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक संजय पाटील व संचालिका अॅड. शीतल पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. शीतल पाटील यांनी केले. त्यांनी आपल्या मनोगतातून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचा आढावा घेत, त्यांच्या दृढ नेतृत्व, देशप्रेम व एकीच्या भावनेचा विशेष उल्लेख केला.
संचालक संजय पाटील यांनी उपस्थितांना पटेल जयंतीच्या शुभेच्छा देत सांगितले की, "देशातील युवकांनी सरदार पटेल यांच्या नेतृत्वगुणांचा आदर्श घ्यावा आणि समाजसेवेचा मार्ग स्वीकारावा."
या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनीही आपल्या मनोगतातून समाजातील एकता, संयम आणि त्यागाची गरज अधोरेखित केली. व्यसनमुक्तीच्या कार्यात सरदार पटेल यांच्या प्रेरणेतून कार्य करण्याचा संदेश देत सर्वांना समाजहितासाठी एकत्र राहण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सालेम पठाण यांनी मनोगतपूर्ण पद्धतीने केले. संपूर्ण कार्यक्रमात देशभक्तीचा आणि सामाजिक बांधिलकीचा सुर निनादत राहिला.