लातूर जिल्ह्यात आमदार रोहित दादा पवार यांचा अतिवृष्टी पाहणी दौरा


   लातूर, दि. २ (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष–शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते व आमदार मा. रोहित दादा पवार यांनी २ ऑक्टोबर रोजी लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करून शेतकरी व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या वेळी त्यांनी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

अहमदपूर, जळकोट, उदगीर, देवणी, निलंगा व औसा तालुक्यातील थोडगा, मोघा, शिंदगी, बेळसांगवी, हाळी-हंडरगुळी, बोरगाव खु., तिरूका, नळगीर, उदगीर, वलांडी, धनेगाव, दादगी, लिंबाळा, हासोरी, बडूर, किल्लारी व उजनी या गावांना भेट देऊन पिकांचे झालेले नुकसान व जनजीवन विस्कळीत झाल्याची माहिती त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

दौऱ्यात पवार यांनी बडूर (ता. निलंगा) येथील हत्या झालेल्या निष्पाप शिक्षक कै. गुरुलिंग हासुरे, तसेच आत्महत्या केलेले शेतकरी थोडगा (ता. अहमदपूर) येथील कै. भास्कर तरडे व दादगी (ता. निलंगा) येथील कै. शिवाजी मेळळे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

यावेळी त्यांनी सांगितले की, “१० ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, ओला दुष्काळ जाहीर करणे, पीकविमा तसेच अतिवृष्टीग्रस्तांना सरसकट मदत जाहीर न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष–शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन उभारले जाईल.”

या पाहणी दौऱ्यात पक्षाचे जेष्ठ नेते माजी मंत्री मा. विनायकराव पाटील, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, रायुकॉंशपचे प्रदेश सरचिटणीस प्रा. प्रशांत घार, जिल्हाध्यक्ष भरत सुर्यवंशी यांच्यासह पक्षाचे विविध फ्रंटल व सेलचे प्रदेश, जिल्हा, तालुका व शहर पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने सर्वसामान्य नागरिक सहभागी झाले होते.

या दौऱ्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष–शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांनी दिली.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर