कारखानदारांची मस्ती खपवून घेतली जाणार नाही — ऊस-सोयाबीन परिषदेत तुपकरांचा इशारा”




“शेतकऱ्यांची परिस्थिती विदारक; कर्जमुक्तीसाठी
 आंदोलनाशिवाय पर्याय नाही — रविकांत तुपकर”
     लातूर, दि. 1६ (प्रतिनिधी) : लातूर बाजार समितीतील दगडूजी दादा देशमुख सभागृहात आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेतर्फे “ऊस-सोयाबीन परिषद” पार पडली. या परिषदेला प्रचंड शेतकरी उपस्थिती लाभली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर प्रमुख उपस्थित होते, तर आयोजनाची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष राजूभाऊ कसबे यांनी पार पाडली.

परिषदेत शेतकऱ्यांच्या अडचणी, ऊस व सोयाबीन दरातील अन्याय, तसेच कर्जमुक्ती या तातडीच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली.

रविकांत तुपकर म्हणाले:
“शेतकरी जातीच्या प्रश्नावर एकत्र येतो, पण मातीच्या प्रश्नावर विभागतो — हीच आपली सर्वात मोठी शोकांतिका आहे. इंग्रज परवडले, पण हे सरकार परवडत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवरही राजकारण सुरू आहे, मदतीसाठी निकष ठरवले जात आहेत. आजची लढाई स्वातंत्र्याच्या लढाईपेक्षाही कठीण आहे.”

तुपकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आवाहन करताना सांगितले की, “आपण सर्वांनी एकत्र येऊन नव्या स्वातंत्र्याची लढाई लढायची आहे — ही लढाई केवळ शेतकऱ्यांच्या नव्हे, तर त्यांच्या लेकरांच्या भवितव्याची आहे.”

ऊस प्रश्नावर भाष्य करताना त्यांनी सांगितले: “मराठवाड्यातील ऊस उत्पादक एकत्र नसल्यामुळे त्यांना योग्य दर मिळत नाही. कारखानदार ऊस तोलताना ‘काटा मारून’ शेतकऱ्यांची लूट करत आहेत. रिकव्हरीतील चोरी थांबवली पाहिजे, एकरकमी एफआरपी दिली पाहिजे. एफआरपीबरोबर प्रति टन 200 रुपयांची वाढ देणे आणि 14 दिवसांच्या आत ऊसाचे पैसे देणे बंधनकारक असले पाहिजे,” अशी ठाम मागणी त्यांनी केली.

सोयाबीन विषयावर बोलताना ते म्हणाले:
“सध्या बाजारात सोयाबीन हमीभावापेक्षा कमी दराने विकले जात आहे. सोयाबीनचे भाव सोयापेंड निर्यातीवर अवलंबून आहेत. त्यामुळे सरकारने सोयापेंड निर्यातीस परवानगी द्यावी आणि परदेशातून तेल व कापूस आयात करू नये. मागील आंदोलनानंतर निर्यात खुली झाल्यावर भाव वाढले होते; यावेळीही तोच निर्णय घेतला पाहिजे.”

कर्जमुक्तीबाबत तुपकरांचा इशारा:
“सरकारने तातडीने शेतकरी कर्जमुक्ती जाहीर करावी आणि नुकसानभरपाई म्हणून एकरी 50 हजार रुपयांची मदत द्यावी. अन्यथा मोठ्या आंदोलनाशिवाय पर्याय नाही. सरकार जर दुर्लक्ष करत राहिले, तर आम्ही रस्त्यावर उतरून न्याय मिळवू,” असे तुपकर यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले, “आगामी काळात ऊस, सोयाबीन, कापूस आणि कर्जमुक्ती या प्रश्नांवर राज्यभरात मोठं आंदोलन उभं केलं जाईल.” तरुणांना उद्देशून त्यांनी आवाहन केले: “आजची तरुण पिढी नेत्यांचे फोटो घरात लावते, पण आपल्या आईवडिलांचे विसरते. शेतकरी बापाचं दुःख न जाणणं हीच आजची खरी शोकांतिका आहे. आत्महत्या नकोत — भगतसिंगांचा आदर्श घ्या आणि अन्यायाविरुद्ध उभे राहा.”

तुपकर यांनी लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा उत्साह आणि संघटनेचा पाठिंबा कौतुकास्पद असल्याचे सांगितले. “सभेला जमलेली गर्दी ही संघटनेच्या बळाची साक्ष आहे,” असे ते म्हणाले. परिषदेत महिलांची स्वतंत्र संघटना उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. परिचारिकांना कायमस्वरूपी नोकरी आणि किमान वेतन मिळावे, अशी मागणीही करण्यात आली.

सभेच्या अखेरीस तुपकर म्हणाले —
“सरकार आणि कारखानदार शेतकऱ्यांचा गैरफायदा घेत राहिले, तर क्रांतिकारी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. आता अन्याय खपवून घेतला जाणार नाही.”

या परिषदेला लातूरसह आसपासच्या जिल्ह्यांतील ऊस, सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केल्याचे उपस्थितांनी सांगितले. सरकारने न्याय न दिल्यास राज्यभर रोष उसळेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर