पुरस्कार्थींच्या प्रयत्नांना यश, मुंबई प्रवासाची तयारी सुरू!
अहिल्यानगर, दि. २८ (प्रतिनिधी): घाटातून महाराष्ट्र शासन “समाज भूषण पुरस्कार्थी” योजनेशी निगडित शिवशाही, शिवनेरी, शयनयान बस पुढे नेण्याचा मार्ग बराच काळ बंद झाला होता. परंतु, सातत्याने केलेल्या प्रयत्नांना अखेर यश लाभले आहे.
दि. ९ ऑक्टोबर रोजी, मुंबई येथील मा. उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कार्यालयात मा. वैजनाथजी वाघमारे यांनी फलदायी चर्चा केली. त्या चर्चेतून या समाजभूषण पुरस्कार्थी योजनेचा पुढील मार्ग स्पष्ट झाला व “घाटातील एस.टी.” पुन्हा मार्गावर आली, असे प्रत्यक्ष चर्चेनंतर सांगण्यात आले.
त्यानंतर दि. २६ ऑक्टोबर रोजी अहिल्यानगर येथे झालेल्या पुरस्कार्थी मेळाव्यात, वाघमारेजींनी स्पष्ट ग्वाही दिली.
“शिवशाही, शिवनेरी व शयनयान या बस समाजभूषण पुरस्कार्थींच्या सामाजिक कार्यासाठी वापरल्या जातील. या कार्यासाठी होणारा खर्च शासनाकडून ‘मानधन’ स्वरूपात मिळवून देण्याची तरतूद केली जाईल. एस.टी.चे स्टेअरिंग मी स्वतः हाती घेत आहे, परंतु पुरस्कार्थी प्रवाशांनी खंबीर साथ दिली तर ही एस.टी. थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मंत्रालयापर्यंत पोहोचवू.”
वाघमारेजींच्या या आत्मविश्वासपूर्ण घोषणेनंतर उपस्थित पुरस्कार्थी बंधुभगिनींनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. “घाटातील एस.टी.” आता पुन्हा चालू झाली असल्याचे प्रतीकात्मक वक्तव्य सर्वांच्या मनात नवी ऊर्जा निर्माण करून गेले.
आता पुढील टप्पा मुंबईचा!
घाटातील हा टप्पा पार करण्यासाठी “वंदनीय यशवंतराव चव्हाण सभागृह, मुंबई” येथे पुढील बैठक घेण्याचे ठरले आहे. या बैठकीत सहकुटुंब-सहपरिवार उपस्थित राहून आपले मत मांडावे, असा निर्णय एकमताने घेण्यात आला.
बैठकीनंतर बस पुढे नेण्याची हमी व जबाबदारी पुन्हा एकदा मा. वैजनाथजी वाघमारे यांनी स्वीकारली.
आता सर्व पुरस्कार्थी बंधु-भगिनींना आवाहन करण्यात आले आहे —
“चला तर, मुंबईचा टप्पा लवकरच पार करण्याची तयारी करूया.
तारीख लवकरच जाहीर होईल — चला एकदिलाने, एकसुराने पुढे जाऊया!”
या निर्णयाने समाजभूषण पुरस्कार्थींच्या आंदोलनाला नवा वेग मिळाल्याचे मानले जात आहे. “घाटातील एस.टी.” पुन्हा एकदा गती घेत आहे आणि लवकरच ती थेट मंत्रालयापर्यंत पोहोचेल, असा सर्वांचा विश्वास व्यक्त करण्यात आला.