आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाला योग्य प्रतिनिधित्व मिळालेच पाहिजे — माजी खासदार प्रा. डॉ. जोगेंद्र कवाडे
लातूर (प्रतिनिधी): रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (कवाडे गट) चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी खासदार प्रा. डॉ. जोगेंद्र कवाडे हे गुरुवार, दि. ३० ऑक्टोबर २०२५ रोजी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. सकाळी ११:३० वाजता शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकार परिषद घेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
या वेळी बोलताना डॉ. कवाडे म्हणाले की, “कर्नाटक राज्यात दहावीतील विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती योजना राबविली जाते, मात्र आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात अशी योजना अद्याप सुरू झालेली नाही, हे खेदजनक आहे. सामाजिक प्रगतीसाठी शिक्षणाचे संधी सर्वांना समानपणे मिळणे गरजेचे आहे. म्हणून महाराष्ट्र सरकारने तात्काळ अशा प्रकारची योजना सुरु करून दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे.” त्यांनी पुढे सांगितले की, “बिहार राज्यातील बौद्ध बिहार येथील बौद्ध विहार स्थानिक बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात यावे, ही आमची जुनी मागणी असून या प्रश्नावर आम्ही लवकरच आंदोलन करण्याचा इशारा देतो.”
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना डॉ. कवाडे यांनी सांगितले की, “आमचा पक्ष राज्यभर संघटन वाढविण्यावर भर देत आहे.
समाजातील वंचित, मागास, दलित आणि अल्पसंख्याक घटकांना न्याय देण्यासाठी आम्ही काम करत आहोत. या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पार्टीला योग्य त्या जागा मिळाव्यात, म्हणून आम्ही राज्य सरकारसोबत आहोत. आम्ही सत्तेच्या वाटेकरी होण्यासाठी नव्हे, तर समाजाच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी सहकार्य करत आहोत.”
त्यांनी पुढे सांगितले की, “पीपल्स रिपब्लिकन पार्टी आमच्या सोबत असून सामाजिक आणि राजकीय पातळीवर आम्ही एकत्रितपणे कार्यरत आहोत. सामाजिक न्याय, समता आणि बंधुतेच्या तत्त्वांवर आमचा पक्ष ठाम आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये आमचे उद्दिष्ट म्हणजे दलित, मागासवर्गीय व सर्वसामान्य जनतेला प्रतिनिधित्व मिळवून देणे आहे.”
या पत्रकार परिषदेस जिल्हा अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. कवाडे यांच्या वक्तव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून त्यांच्या दौऱ्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नवीन उर्जा व आत्मविश्वास निर्माण झाला आहे. यावेळी रामराजे आत्राम, सोनकांबळे उपस्थित होते.