सरकारकडून दहा लाख घरांचा संकल्प : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
मुंबई, दि.२६ (प्रतिनिधी) : राज्यातील सर्वसामान्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असून दहा लाख लोकांना घरे देण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे, अशी ग्वाही राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
ते मुंबईत आयोजित द रियल इस्टेट फोरमच्या कार्यक्रमात बोलत होते. या वेळी गृहनिर्माण क्षेत्रातील तज्ञ, बांधकाम व्यावसायिक, बँकिंग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि शेकडो उपस्थित मान्यवरांची उपस्थिती होती.
सरनाईक म्हणाले की, "घर हे प्रत्येक कुटुंबाचे मूलभूत स्वप्न आहे. ते पूर्ण करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. शहरी भागात झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे परवडणारी घरे ही मोठी गरज आहे. त्यासाठी नवीन गृहनिर्माण प्रकल्प, पायाभूत सुविधा विकास, तसेच खाजगी क्षेत्राशी भागीदारी वाढवून दहा लाख लोकांना घरे उपलब्ध करून दिली जातील."
मंत्री सरनाईक यांनी या उपक्रमामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, मध्यमवर्गीय तसेच शहरी झोपडपट्टी पुनर्वसन योजना यांना प्राधान्य दिले जाईल, असेही स्पष्ट केले. त्यांनी बांधकाम व्यावसायिकांना आवाहन करताना म्हटले की, "सरकारकडून सर्व आवश्यक परवानग्या सुलभ केल्या जातील. पारदर्शकता, गुणवत्ता आणि वेळेत प्रकल्प पूर्ण करणे हीच खरी लोकसेवा ठरेल."
या उपक्रमामुळे रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधांचा विकास आणि शहरीकरणाची प्रक्रिया गतीमान होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमात बोलताना तज्ञांनी या योजनेमुळे रिअल इस्टेट क्षेत्रात नवा उत्साह निर्माण होईल, असे मत व्यक्त केले.
दहा लाख घरांचा संकल्प हा सरकारचा मोठा उपक्रम ठरणार असून पुढील काही महिन्यांत त्याचे नियोजन आणि अंमलबजावणीच्या टप्प्यांची माहिती जाहीर होणार आहे, असल्याची माहिती सरनाईक यांनी यावेळी बोलताना सांगितले.