मुंबई येथे होणार हिंदू मातंग समाजाचे २० सप्टेंबरला भव्य संमेलनाचे आयोजन
उदगीर, दि. १० (प्रतिनिधी) : हिंदू मातंग समाजातील बांधवांचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. समाजात याबाबत जागृती निर्माण व्हावी तसेच समाजबांधवांनी एकत्रितपणे समाजहितासाठी पुढे यावे, या उद्देशाने वाशी-मुंबई येथे हिंदू मातंग संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन येत्या २० सप्टेंबर २०२५ रोजी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात होणार आहे.
या संमेलनात मातंग समाजातील बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन इंदिराबाई गायकवाड चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा तसेच सामाजिक कार्यकर्त्या इंदिराबाई गायकवाड यांनी केले आहे.
या संमेलनाच्या आयोजनासाठी दिलीपकुमार गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले असून समाजाच्या प्रबोधनासाठी हे संमेलन मैलाचा दगड ठरणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या संमेलनाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य व धर्मजागरण प्रमुख शरद राव धुळे उपस्थित राहणार आहेत. तसेच कोकण प्रांताचे धर्मजागरण प्रमुख राजेश कुंटे याही संमेलनात मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
हिंदू मातंग समाजातील बांधवांनी एकत्रित येऊन सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रात भक्कम पायाभरणी करणे अत्यंत गरजेचे आहे. या संमेलनातून समाजात ऐक्य, जागृती व धर्माबद्दलची निष्ठा अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.