चाईल्ड केअर सामाजिक संस्थेचे नवव्या वर्षात यशस्वी पदार्पण
उरण दि. २ (विठ्ठल ममताबादे) – “समाज सेवा हीच खरी ईश्वर सेवा” हे ब्रीद घेऊन स्थापन झालेल्या रायगडमधील चाईल्ड केअर सामाजिक संस्थेने ८ वर्षे पूर्ण करून आता ९व्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे. २०१७ पासून या संस्थेने विविध सामाजिक उपक्रम राबवले असून, कोविड काळातील मदतकार्य, रक्तदान शिबिरे, आदिवासी व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक व आर्थिक सहाय्य, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, आजारग्रस्तांना मदत, महिलांचा व कलाकारांचा गौरव अशा अनेक उपक्रमांतून संस्थेने आपली ओळख निर्माण केली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही संस्थेची २०२५-२६ ची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. संस्थापक अध्यक्षपदी श्री. विकास कडू तर रायगड जिल्हा अध्यक्षपदी श्री. विवेक पाटील यांची निवड झाली. कार्यकारिणीमध्ये उरण, पनवेल, पेण आदी भागातील विविध पदाधिकारी व सदस्यांचा समावेश आहे.
या यशस्वी प्रवासाबद्दल अनेक सामाजिक संस्था, संघटना व कार्यकर्त्यांनी चाईल्ड केअर सामाजिक संस्थेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.