श्री. चंद्रकांत वाघमारे यांचा समाजभूषण पुरस्कारानिमित्त लातूरमध्ये सत्कार समारंभ संपन्न

लातूर, दि.६ सप्टेंबर –
महाराष्ट्र शासनाचा यंदाचा प्रतिष्ठित साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल लातूरचे ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते व जनतेचे लाडके व्यक्तिमत्त्व श्री. चंद्रकांत वाघमारे यांचा सत्कार लातूर शहरात मोठ्या उत्साहात व स्नेहसभेच्या वातावरणात संपन्न झाला.

हा कार्यक्रम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास मंडळ, लातूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. मंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. बाळासाहेब चव्हाण तसेच जिल्हा व्यवस्थापक श्री. गोविंदराव सांगवीकर यांच्या हस्ते श्री. वाघमारे यांचा मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी मंडळाचे रोखपाल श्री. सूर्यवंशी साहेब यांचाही यथोचित गौरव करून त्यांना शाल, श्रीफळ प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमात जयकुमार सगट, माजी जिल्हा व्यवस्थापक श्री. उद्धव गोटमुकले, मच्छिंद्र कलवले, अनंत दोरवे, कसबे आदी मान्यवर उपस्थित होते. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना श्री. वाघमारे यांनी केलेल्या सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्य क्षेत्रातील कार्याचा विशेष गौरव केला.

वक्त्यांनी नमूद केले की, अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे आजच्या काळात पुनरुज्जीवन करण्याचे कार्य वाघमारे यांनी सातत्याने केले आहे. सामाजिक ऐक्य, वंचित समाजातील प्रश्न, सांस्कृतिक चळवळींमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यांच्या लेखनातून समाजाला दिशा देण्याचे कार्य त्यांनी गेली अनेक दशके प्रामाणिकपणे बजावले आहे.

    सत्काराला प्रतिसाद देताना श्री. चंद्रकांत वाघमारे म्हणाले, “हा पुरस्कार माझ्या वैयक्तिक कार्याचा नाही तर समाजाच्या एकत्रित प्रयत्नांचा मान आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दाखवून दिलेला संघर्ष, विचार व परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे हेच माझे कर्तव्य आहे. हा सन्मान मला आणखी जोमाने कार्य करण्याची प्रेरणा देईल.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे पदाधिकारी यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी श्री. वाघमारे यांना शुभेच्छा दिल्या.

   या सत्कार सोहळ्यामुळे लातूर शहरात आनंदाचे वातावरण पसरले होते. समाजातील विविध घटकांकडून श्री. वाघमारे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या कार्याला नवचैतन्य लाभले आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर