अतिवृष्टीग्रस्त उजनीत मुख्यमंत्री फडणवीस व पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची पीक पाहणी



     उजनी, दि. २४ (ता. औसा, जि. लातूर) :
लातूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी बुधवार, दि. २४ सप्टेंबर २०२५ रोजी राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी औसा तालुक्यातील उजनी व निलंगा येथील नणंद व औराद शहाजनी परिसराला भेट दिली.

अवकाळी पावसामुळे सोयाबीन, उडीद, मूग, कापूस यांसारखी खरीप पिके मोठ्या प्रमाणावर नष्ट झाली आहेत. शेतशिवारात पाणी साचल्यामुळे उभे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. या गंभीर परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री व पालकमंत्री यांनी उजनी गावातील शेतशिवाराला भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.

शेतकऱ्यांनी यावेळी आपली व्यथा मांडताना सांगितले की, अतिवृष्टीमुळे पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले असून अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतीसाठी घेतलेली कर्जे परतफेड करणेही अशक्य झाले आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी शासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या समस्या धीराने ऐकून घेतल्या. त्यांनी प्रशासनाकडून पंचनाम्याची प्रक्रिया व मदतकार्याचा आढावा घेतला. यावेळी ते म्हणाले, “शेतकऱ्यांचे नुकसान गंभीर आहे. शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. पंचनामे तातडीने पूर्ण करून प्रत्येक शेतकऱ्याला त्वरित मदत दिली जाईल. कुणालाही मदतीसाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही. शेतकऱ्यांना दिलासा देणे हीच आमची प्राथमिकता आहे.”

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देत पंचनाम्याची गती वाढविण्याचे निर्देश दिले. त्यांनी सांगितले की, “लातूर जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शासनाची मदत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्व यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागल्या पाहिजेत.”

या पाहणी दौऱ्यात जिल्हाधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकारी, संबंधित विभागांचे अधिकारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. उजनी व परिसरातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्या आश्वासनामुळे शासन आपल्या पाठीशी आहे, असा दिलासा व्यक्त केला.

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाकडून वेळेवर मदत मिळाल्यास शेतकरी सावरतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर