लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर महिला आरक्षण : स्त्रीशक्तीच्या बळकटीकरणाची नवी दिशा
लोकशाहीमध्ये प्रतिनिधित्वाला विशेष महत्त्व असते. ग्रामीण भागातील विकास, शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण, शेतकऱ्यांचे प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्रभावी कारभार या सर्व गोष्टींसाठी सक्षम नेतृत्वाची गरज असते. महाराष्ट्रातील मराठवाडा हा ऐतिहासिकदृष्ट्या मागासलेला प्रदेश मानला जातो. येथे महिलांचे राजकीय क्षेत्रातील प्रतिनिधित्व वाढावे, महिलांच्या नेतृत्वाला संधी मिळावी यासाठीच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. त्यातून महिलांना मिळणारी संधी म्हणजे केवळ एका व्यक्तीचे पद भूषवणे नव्हे, तर स्त्रीशक्तीला चालना मिळवून देण्याचे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी २०२५ मध्ये झालेल्या सोडतीनुसार पुन्हा एकदा हे पद महिलांसाठी राखीव झाले आहे. यापूर्वी ३ अध्यक्षपदांपैकी तीन महिलांनी अध्यक्षपद भूषवले असून, आता चौथ्यांदा महिला नेतृत्व उदयास येणार आहे. ग्रामीण भागातल्या मोठ्या प्रश्नांवर निर्णय घेण्याचे, विकासकामे राबविण्याचे, शैक्षणिक व सामाजिक उपक्रम पुढे नेण्याचे हे एक महत्वाचे व्यासपीठ आहे. त्यामुळे या आरक्षणाच्या निर्णयामुळे महिलांच्या हातात विकासाची सूत्रे येणार आहेत.
महिलांच्या सहभागाचे महत्त्व:-
महिला म्हणजे कुटुंबाचा गाभा. समाजातील प्रश्नांना त्या भावनिकदृष्ट्या जवळून अनुभवतात. पाणीटंचाई, शिक्षणातील अडचणी, महिलांवरील अन्याय, आरोग्य समस्या, रोजगाराची कमतरता अशा प्रश्नांवर महिलांचे दृष्टिकोन पुरुषांच्या तुलनेत अधिक संवेदनशील आणि वास्तववादी असतात. त्यामुळे महिलांनी सत्तेच्या गादीवर बसणे म्हणजे ग्रामीण विकासाच्या संकल्पनांना नवी दिशा मिळणे होय.
आरक्षणामुळे महिलांना राजकारणात प्रवेश मिळाला आहे, मात्र केवळ संधी मिळणे पुरेसे नाही. त्या संधीचे सोने करण्यासाठी कौशल्य, निर्धार, आणि लोकांच्या प्रश्नांशी नाळ जोडलेली हवी. लातूरच्या आधीच्या महिला अध्यक्षांनी हे दाखवून दिले आहे की महिला नेतृत्व देखील सक्षमतेने विकासकामे करू शकते. त्यामुळे या चौथ्या कार्यकाळातही अशीच अपेक्षा आहे.
मराठवाड्यातील व्यापक परिणाम:-
लातूरसह मराठवाड्यातील इतर सहा जिल्ह्यांमध्येही महिलांना अध्यक्षपदासाठी आरक्षणाचा लाभ मिळत आहे. हे चित्र केवळ एक राजकीय तांत्रिक निर्णय नसून, महिलांच्या नेतृत्वक्षमतेला मान्यता देणारे आहे. यामुळे राजकीय पक्षांनाही महिलांना पुढे आणण्याची जबाबदारी पार पाडावी लागेल. आतापर्यंत महिला उमेदवारांना कुटुंब, समाज किंवा पक्षाचा आधार किती मिळतो यावर त्यांच्या यशाचे गणित ठरत आले आहे. परंतु आता जनतेची मानसिकताही बदलत आहे. महिला उमेदवारांकडून अधिक चांगल्या कामाची, पारदर्शकतेची अपेक्षा वाढली आहे.
आव्हाने आणि अपेक्षा:-
आरक्षणाचा अर्थ केवळ सत्तेवर बसणे नाही, तर जबाबदारी पार पाडणे आहे. महिलांना अध्यक्षपद मिळाल्यानंतर त्यांच्यासमोर काही मोठी आव्हाने उभी राहणार आहेत.
- ग्रामीण भागातील पाणीटंचाई, रस्ते, शिक्षण आणि आरोग्य हे प्रमुख प्रश्न.
- महिलांवरील अन्यायाविरोधात कडक भूमिका घेणे.
- शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संवेदनशील निर्णय घेणे.
- भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका घेऊन लोकांचा विश्वास संपादन करणे.
या आव्हानांना तोंड देत महिला नेतृत्वाने आपल्या कार्यक्षमतेने छाप पाडली तर लातूर जिल्हा परिषद राज्याच्या इतर परिषदांसाठी आदर्श ठरू शकते.
लोकशाहीतील स्त्रीशक्तीचा उदय :-
महिलांना पुन्हा एकदा लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी मिळणे हा केवळ योगायोग नाही, तर समाजातील बदलत्या मानसिकतेचा परिपाक आहे. आज स्त्रिया केवळ घरापुरत्या मर्यादित नाहीत, तर त्या शिक्षण, नोकरी, उद्योग, आणि आता राजकारण अशा प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. अध्यक्षपदासारख्या जबाबदार पदांवर महिलांचे नेतृत्व म्हणजे लोकशाहीतील स्त्रीशक्तीचा खरा उदय.
निष्कर्ष:-
लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी महिलांना मिळालेलं आरक्षण हे ग्रामीण महिलांच्या राजकीय सक्षमीकरणाचं प्रतीक आहे. चौथ्यांदा महिला अध्यक्ष होणार ही बाब समाजातील बदलत्या वास्तवाची साक्ष देते. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा आवाज बुलंद होईल आणि विकासाचा नवा अध्याय सुरू होईल. आता गरज आहे ती महिलांनी आपल्या कार्यक्षमतेने, प्रामाणिकतेने आणि संवेदनशील दृष्टिकोनातून या संधीचं सोने करण्याची. अशा प्रकारे हा निर्णय लातूरसह संपूर्ण मराठवाड्यातील स्त्रीशक्तीला नवा आत्मविश्वास देणारा ठरणार आहे.