तिरू नदी सुटकेस खून प्रकरण उघडकीस, पतीसह आरोपी अटकेत- पोलीस अधीक्षक तांबे यांची माहिती
लातूर, दि. ४ (प्रतिनिधी) – वाढवणा पोलीस ठाणे हद्दीतील तिरू नदीच्या पात्रात सुटकेसमध्ये आढळलेल्या २३ वर्षीय महिलेच्या खुनाचा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत उलगडा केला आहे. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी आज पत्रकार परिषदेत याबाबत सविस्तर माहिती दिली.
प्रकरणाची पार्श्वभूमी
दि. २४ ऑगस्ट रोजी चाकूर–शेळगाव फाटा मार्गावरील तिरू नदीवरील पुलाखाली सुटकेसमध्ये कुजलेल्या अवस्थेतील महिलेचा मृतदेह आढळला होता. परिसरातील शेतकऱ्यांना आलेल्या उग्र वासामुळे ही घटना उघडकीस आली. मृतदेह पूर्णतः विघटित झाल्याने महिलेची ओळख पटविणे कठीण होते. वाढवणा पोलीस ठाण्यात गु.र. क्र. २३०/२०२५ कलम १०३(१), २३८ भा.दं.वि. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनास्थळी मिळालेली ट्रॉली बॅग (Big-Way कंपनीची), मयताने परिधान केलेली वस्त्रे, दागिने, बांगडी आदी साहित्य तसेच शवविच्छेदन अहवालाच्या आधारे तपासाची दिशा निश्चित करण्यात आली.
तपासाची सांगड
अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पाच स्वतंत्र तपास पथके गठित करण्यात आली. या पथकांनी सुटकेस व वस्त्र उत्पादक-विक्रेते, सीमावर्ती जिल्ह्यातील मिसिंग रेकॉर्ड, ३७० प्रकरणांची तपासणी, सीसीटीव्ही फुटेज, एआय स्केच तसेच औद्योगिक भागातील चौकशी या सर्व पद्धतींनी माहिती गोळा केली.
दरम्यान, उदगीर-चाकूर येथील साखर कारखान्यात काम करणाऱ्या एका कामगार कुटुंबातील महिला काही दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली. संशय वाढल्याने तिचा पती जीया उल हक याच्यावर लक्ष ठेवण्यात आले. तो आपल्या पत्नीचा मिसिंग दाखल करण्यासाठी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात येताच पोलिसांनी त्याची पडताळणी केली. रेखाचित्र व छायाचित्र जुळल्याने चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
गुन्ह्याचा उलगडा
अटक आरोपी जीया उल हक (वय ३४, मूळ रा. कुशीनगर, उत्तर प्रदेश) हा साखर कारखान्यात मेन्टेनन्सचे काम करत होता. त्याला पत्नी फरीदा खातून (वय २३) हिच्या चारित्र्यावर संशय होता. त्यामुळे १५ ऑगस्ट रोजी साथीदारांच्या मदतीने त्याने पत्नीचा गळा दाबून खून केला व मृतदेह सुटकेसमध्ये भरून नदीत फेकून दिला.
अटक आरोपी
- जीया उल हक (३४)
- सज्जाद जरूल अन्सारी (१९)
- अरबाज जमलू अन्सारी (१९)
- साकीर इब्राहिम अन्सारी (२४)
- आजम अली उर्फ गुड्डू (१९)
हे सर्व आरोपी मूळचे कुशीनगर, उत्तर प्रदेश येथील आहेत. सर्वांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
पुढील कारवाई
सदर आरोपींना आज न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. या संपूर्ण कारवाईत पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकांनी अथक परिश्रम घेऊन अत्यंत क्लिष्ट असा गुन्हा उघडकीस आणला.