'प्रेस सेवा’ (PRGI) पोर्टलमुळे नोंदणी सोपे
नवी दिल्ली, दि. 22 : प्रेस रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया (PRGI) यांनी देशभरातील वृत्तपत्रे व मासिकांच्या नोंदणी प्रक्रियेला अधिक सुलभ, पारदर्शक व वेगवान करण्यासाठी ‘प्रेस सेवा’ (Press Sewa) पोर्टलचे उद्घाटन केले आहे. या पोर्टलमुळे आता वृत्तपत्र व पत्रिकांचे नोंदणी, परवाने, नूतनीकरण तसेच इतर सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहेत.
या उपक्रमामुळे प्रकाशक, संपादक व पत्रकारांना वेळेची बचत होणार असून, अनावश्यक कागदोपत्री प्रक्रिया टाळली जाणार आहे. यापूर्वी वृत्तपत्रे व मासिकांची नोंदणी प्रक्रिया बर्याच क्लिष्ट व वेळखाऊ होती. अनेक वेळा अर्जदारांना वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये वारंवार फेऱ्या माराव्या लागत. मात्र ‘प्रेस सेवा’ पोर्टलमुळे ही सर्व प्रक्रिया एका क्लिकवर होणार आहे.
प्रेस रजिस्ट्रार जनरल यांनी सांगितले की, या पोर्टलवर नवीन वृत्तपत्र/पत्रिकेची नोंदणी, जुन्या परवान्यांचे नूतनीकरण, शीर्षकाची मान्यता, आवश्यक प्रमाणपत्रे व दस्तऐवजांची पूर्तता, प्रकरणांची सद्यस्थिती ऑनलाईन पाहण्याची सुविधा उपलब्ध असेल.
https://prgi.gov.in/ — येथे तुम्हाला PRGI विषयी माहिती, सेवा, मार्गदर्शक आणि संबंधित अपडेट्स उपलब्ध होतील .
तसेच हे पोर्टल डिजिटल इंडिया मोहिमेचा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, यामुळे पत्रकारिता व प्रकाशन क्षेत्रात पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, आता कोणत्याही प्रकाशकाला आपल्या वृत्तपत्र/पत्रिकेसाठी दिल्ली किंवा राज्याच्या कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता राहणार नाही. मोबाईल, टॅब किंवा संगणकाच्या सहाय्याने आवश्यक कागदपत्रे अपलोड करून, ऑनलाइन शुल्क भरून व अर्जाची स्थिती तपासून नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया घरबसल्या पूर्ण करता येणार आहे.
पत्रकार व प्रकाशक संघटनांनीही या निर्णयाचे स्वागत केले असून, ग्रामीण व लहान शहरांतील संपादकांसाठी ही योजना मोठा दिलासा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
एकूणच ‘प्रेस सेवा’ पोर्टलमुळे भारतातील वृत्तपत्रे व मासिकांचे नोंदणी व्यवस्थापन अधिक सोपे, पारदर्शक व वेगवान होणार असून, प्रकाशन क्षेत्राचा डिजिटल परिवर्तनाकडे मोठा टप्पा पार पडला आहे.