वलांडी येथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी
देवणी : साहित्य विश्वाचा बादशहा साहित्यसम्राट साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त वलांडी ता.देवणी येथे आ.सचिन भाऊ साठे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सचिन साठे बोलताना म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त वलांडी येथे जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले समाजप्रेमी सचिन साठे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव करताना आपले विचार व्यक्त केले.
सचिन साठे म्हणाले की, “अण्णाभाऊ साठे हे खऱ्या अर्थाने सामान्य जनतेचे गायक होते. त्यांनी आपल्या पोवाड्यांतून, लावण्या व साहित्यकृतींमधून समाजातील शोषित, पीडित, उपेक्षित वर्गाच्या भावना मांडल्या. त्यांचे आयुष्य हे संघर्षमय असूनही त्यांनी लोकांना एकजूट, समानता आणि सामाजिक न्यायाचा संदेश दिला. त्यांची साहित्यकृती आजही समाजाला प्रेरणा देत आहे.”
ते पुढे म्हणाले की, “आजच्या पिढीने अण्णाभाऊंच्या विचारांचा वारसा जपण्याची गरज आहे. समाजातील विषमता दूर करून शिक्षण, जागृती आणि सांस्कृतिक बांधिलकी यांतून खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवता येईल. अण्णाभाऊंची जयंती ही फक्त उत्सव न राहता सामाजिक परिवर्तनासाठी प्रेरणा देणारा सोहळा व्हावा.” कार्यक्रमाच्या प्रारंभी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. गावातील नागरिक, तरुणाई तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी डॉ.अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे कोर कमिटी अध्यक्ष टि.एन.अण्णा कांबळे,ऑल इंडिया पॅथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिपक भाई केदार डॉ.अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे मराठवाडा उपाध्यक्ष विलास भाऊ झुंजरे,आकाश भाऊ घोलप, बालाजी भाऊ कांबळे,मनोज भाऊ गायकवाड व सर्व समाज बांधव उपस्थित होते.