लातूर जिल्ह्यातील ५४५ रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तब्बल ४ कोटी ४० लाखांची मदत
लातूर, दि. २१ :गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरत असून, जानेवारी ते जुलै २०२५ या अवघ्या सात महिन्यांत लातूर जिल्ह्यातील तब्बल ५४५ रुग्णांना ४ कोटी ४० लाख ७९ हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. या मदतीमुळे गंभीर आजारांवर उपचार घेणाऱ्या शेकडो रुग्णांना नवजीवन मिळाले आहे.
या निधीतून हृदयविकार, कर्करोग, किडनी, लिव्हर, बोन मॅरो प्रत्यारोपण, अपघातग्रस्त रुग्ण तसेच एकूण वीस गंभीर आजारांवरील उपचारांसाठी मदत दिली जाते. पूर्वी अशा मदतीसाठी रुग्णांना थेट मंत्रालयात जावे लागत असे. मात्र आता जिल्हास्तरीय कक्ष कार्यान्वित झाल्याने रुग्णांना थेट जिल्ह्यातूनच मदत मिळू लागली आहे. यामुळे वेळ व खर्च वाचत असून तातडीची मदत त्वरित उपलब्ध होत आहे.
विशेष म्हणजे, जिल्हा कक्षाच्या माध्यमातून केवळ गेल्या तीन महिन्यांतच १५८ रुग्णांना मदतीचा हात मिळाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा खऱ्या अर्थाने जनतेचा आधारस्तंभ ठरत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
“शासकीय योजनांचा लाभ मिळाला नाही तर अशा रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा मोठा आधार ठरतो. जिल्हास्तरीय कक्षामुळे आता लातूरकरांना मंत्रालयाची धाव घेण्याची गरज नाही,” अशी माहिती जिल्हा कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.
या निधीमुळे गरीब कुटुंबांना दिलासा मिळून त्यांचे दुःख हलके होत आहे. अनेकांना नवजीवन मिळत असल्याने समाजाच्या तळागाळातील नागरिकांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा खरा वरदान ठरत असल्याचे सर्वत्र नमूद केले जात आहे.