मालमत्ता करात 💯 टक्के व्याज माफीचे आवाहन- आयुक्त यांचे आवाहन
लातूर, दि. 13 : कर संकलन व कर आकारणी विभाग, लातूर शहर महानगरपालिका यांच्या तर्फे नागरिकांना दिलासा देण्यासाठी विशेष सवलतींची अंमलबजावणी करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विविध करसवलतीच्या योजना राबवल्या जात असून, मालमत्ता कर भरणाऱ्या करदात्यांसाठी ही मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
स्वातंत्र्य दिनानिमित्त लागू करण्यात आलेल्या या “फेस्टिव्हल ऑफर” अंतर्गत ३ ते १७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत, थकीत कराची रक्कम भरल्यास त्यावरील व्याज किंवा दंडाच्या स्वरूपातील रक्कमेत १०० टक्के माफी दिली जाणार आहे. म्हणजेच, कर थकबाकीदारांनी या कालावधीत केवळ मूळ कराची रक्कम भरली तर त्यांच्यावर असलेले सर्व व्याज/शास्ती रद्द होईल.
मनपा आयुक्त मानसी मीना यांनी सांगितले की, ही संधी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घेऊन आपली थकबाकी तात्काळ भरावी. यामुळे नागरिकांना आर्थिक दिलासा मिळेल तसेच महानगरपालिकेच्या विकासकामांसाठी आवश्यक निधीही उपलब्ध होईल. त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, "या योजनेचा लाभ घेऊन थकीत कराची रक्कम भरून आपण शहराच्या प्रगतीत योगदान द्यावे."
कर न भरल्यामुळे अनेकांना जड व्याज व दंडाचा भार सहन करावा लागत होता. परंतु, ३ ते १७ ऑगस्ट या काळात कर भरल्यास संपूर्ण व्याज माफी ही सुवर्णसंधी आहे. कर विभागाकडून सर्व करदात्यांना ही योजना कळविण्यात आली असून, नागरिकांनी या सवलतीचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, केवळ १५ दिवस उपलब्ध असलेली ही योजना थकबाकीदारांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.