आज पत्रकारांसाठी आयोजित एकदिवसीय कार्यशाळा
* आधुनिक पत्रकारितेच्या नवदृष्टीचा व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराचा अभ्यास*
लातूर, दि. ३१ (प्रतिनिधी) लातूर जिल्ह्यातील माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने पत्रकारांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. आज शुक्रवार दि.१ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता डॉ. भालचंद्र ब्लड बँक सभागृह, लातूर येथे ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे, असे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई अंतर्गत विभागीय माहिती कार्यालय, लातूर आणि जिल्हा माहिती कार्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे (भा.प्र.से.) यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक अमोल तांबे (भा.पो.से.) हे राहणार आहेत. यावेळी विभागीय उपसंचालक (माहिती) श्री. विवेक खडसे हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
कार्यशाळेचे तीन स्वतंत्र सत्रांमध्ये आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या सत्रामध्ये "कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पत्रकारिता" या विषयावर पुरूषोतम रुकमे (जिल्हा सूचना अधिकारी, लातूर) हे मार्गदर्शन करणार आहेत तर दुसऱ्या सत्रामध्ये "संकलन संपादनात शुद्धलेखनाचे महत्त्व" या विषयावर प्रा. दीपक रंगरी (मराठी भाषा तज्ञ) हे मार्गदर्शन करतील तर तिसऱ्या सत्रामध्ये अधिस्वीकृती नियमावली, आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना, शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी या संदर्भात डॉ. श्याम टरके (सहायक संचालक (माहिती), विभागीय माहिती कार्यालय, लातूर) हे मार्गदर्शन करणार आहेत.
पत्रकारांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या या कार्यशाळेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, वृत्तसंकलन व संपादनातील अचूकता, शुद्धलेखनाचे भान यावर सखोल मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच पत्रकारांना उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजना व नियमावलीची माहिती देखील देण्यात येणार आहे.
कार्यशाळेचे संयोजन विभागीय माहिती कार्यालय, लातूर व जिल्हा माहिती कार्यालय, लातूर यांनी केले असून, लातूर जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी या कार्यशाळेस उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.