मालमत्ता कर भरा आणि सवलतीचा लाभ घ्या: मनपा : पाच दिवसांचा कालावधी शिल्लक
लातूर, २७ : महानगरपालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने गत वर्षांप्रमाणे नियमित कर भरणाऱ्या मालमत्ता धारकांसाठी विविध सवलती दिल्या जात आहेत. त्यानुसार ३१ जुलैपर्यंत मालमत्ता कर भरणाऱ्या व ऑनलाईन कर भरणाऱ्या नागरिकांना ५ टक्के सवलत देण्यात येत आहे. या योजनेला मालमत्ता धारकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
महानगरपालिकेच्या वतीने नियमित कर भरणाऱ्या मालमत्ता धारकांसाठी सवलत योजना राबविण्यात आली आहे. आतापर्यंत शहरातील ११ हजारांहून अधिक मालमत्ता धारकांनी स्वतःहून कर भरणा करून सवलत योजनेचा लाभ घेतला आहे.
५ टक्के सवलत
मुदतीत कर भरल्यास ५ टक्के, तसेच ऑनलाईन कर भरल्यास अतिरिक्त २ टक्के अशी एकूण ७ टक्के सवलत दिली जात आहे. यामुळे उर्वरित मालमत्ता धारकांनी तत्काळ कर भरून सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.
३१ जुलैपर्यंत सवलत योजना लागू
सवलत योजना ३१ जुलैपर्यंतच लागू आहे. कर भरण्यासाठी मनपाच्या वेबसाइट, अॅप, तसेच संबंधित लिंक्स, क्षेत्रीय कार्यालये आणि मुख्यालय येथे कर भरणा करून सवलतीचा लाभ घेता येईल.