*लातूर जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन*
लातूर, दि. 16 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत लातूर जिल्ह्यात मुलांची 13 आणि मुलींची 12 अशी एकूण 25 शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी या वसतिगृहांमधील प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली जात आहे. विद्यार्थी https://hmas.mahait.org या संकेतस्थळाचा वापर करून प्रवेश अर्ज भरू शकतात.
शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम मुदत 17 जुलै 2025 आहे, तर अकरावी, बिगर व्यावसायिक पदवी, पदविका प्रथम वर्ष आणि पदव्युत्तर प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही मुदत 23 जुलै 2025 पर्यंत आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी उपरोक्त संकेतस्थळाचा वापर करून किंवा स्थानिक गृहप्रमुख अथवा गृहपाल यांच्याशी संपर्क साधून विहित मुदतीत प्रवेश अर्ज सादर करावेत, असे आवाहन लातूर येथील सहायक आयुक्त (समाज कल्याण) यादव गायकवाड यांनी केले आहे.