ऑटोत विसरलेला 98 हजाराचा ऐवज स्वामी विवेकानंद पोलिसांच्या सतर्कतेमुळे परत.
लातूर दि. 12 जुलै लातूर अहमदपूर जाणाऱ्या ऑटो विसरलेल्या पर्समधील 98 हजाराच्या ऐवज स्वामी विवेकानंद पोलिसांच्या सतर्कतेमुळे मिळाला असून तो मूळ मालकास परत करण्यात आला आहे.
लातूर वरुन अहमदपूर जाणाऱ्या ऑटो रिक्षामध्ये रमाबाई विश्वनाथ वाघमारे ह्या स्वामी विवेकानंद चौक लातूर येथून अहमदपूरला निघाल्या त्या अहमदपूर मध्ये उतरल्यावर त्यांची पर्स ऑटोतच राहिली. ऑटो पुढे निघून गेल्यावर त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ स्वामी विवेकानंद पोलीस ठाणे यांना फोनवरून संपर्क साधून माहिती दिली. दरम्यान तात्काळ पोलिसांनी ऑटो चा माग काढत सीएनजी भरलेल्या पंपावरून ऑटो चा व ऑटो चालकाचा नंबर मिळवत त्याच्याशी संपर्क साधला असता पर्स ऑटोमधे असल्याचे त्यांनी सांगितले. सदर घटना दिनांक 09 जुलै रोजी घडली असून ऑटो चालक महादेव गणपती कांबळे याने आज दिनांक 12 जुलै रोजी स्वामी विवेकानंद पोलीस ठाणे लातूर येथे सदरील व्यक्तीची पर्स परत आणून दिली आहे. या पर्समध्ये 98 हजाराचे सोन्याचे गंठण व महत्त्वाची कागदपत्रे होती.
स्वामी विवेकानंद पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही बॅग परत मिळून आली असून पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक रावसाहेब चव्हाण, पोलीस अंमलदार रवी कांबळे, संजय बेरळीकर व आनंद हल्लाळे यांचे कौतुक केले जात आहे.