नळेगाव येथील बंद पडलेल्या "जय जवान जय किसान साखर कारखान्या"साठी क्रांतिकारी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल : सत्तार पटेल
लातूर, दि. ९ : नळेगाव येथील बंद पडलेला जय जवान जय किसान सह साखर कारखाना चालू करा अन्यथा क्रांतिकारी शेतकरी संघटना शेतकरी सभासदांना घेऊन रस्त्यावर उतरेल असा इशारा श्री सत्तार पटेल यांनी सरकारला दिला आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणाने शेतकऱ्यांचे मरण होत असून शेतकरी मरणाच्या उंबरठ्यावर उभा आहे.शेतमालाला भाव नाही, हाताला काम नाही आधुनिक यांत्रिकीकरणाने उत्पादन खर्च वाढला आहे, पिकाची शास्वती नाही. अशा प्रचंड अडचणीत शेतकरी सापडलेला असताना जनतेच्या पैशावर उभा केलेले कारखाने आज राज्यकर्त्याच्या नाकरतेपणामुळे बंद पडून धूळ खात असल्याने आपला ऊस कुठं गाळप करावा?असा प्रश्न करीत शेतकरी आत्महत्या करणार नाही तर करेल काय अशा संतप्त भावना शेतकऱ्यात आहेत.
जय जवान जय किसान हे पंतप्रधान स्वर्गीय लालबहाद्दूर शास्त्री यांचे लोकप्रिय झालेले घोषवाक्य आज ही आमची वेगळी ओळख करुन देत असते किंबहुना आमच्या देशाची ओळखच कृषिप्रधान राष्ट्र म्हणून आहे. याचा संदर्भ घेऊन लातूर जिल्ह्यात नळेगाव येथे जय जवान जय किसान सह साखर कारखाना उभा केला होता.त्याकाळी शिवराज पाटील चाकूरकर, विलासराव देशमुख शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्वप्नातील प्रगत लातूर म्हणून या संस्था उभा केल्या होत्या त्यामुळे आज देशातील नामांकित कारखान्यात लातूर जिल्ह्याचा उल्लेख होतोय. दुर्दैवाने गेल्या अनेक वर्षांपासून अंबुलगा येथील शिवाजीराव पाटील निलंगेकर साखर कारखाना, किल्लारी साखर कारखान, बेलकुंड येथील मारुती महाराज साखर कारखान आणि नळेगावचा जय जवान जय किसान साखर कारखना बंद पडला होता त्यापैकी मारुती महाराज आणि किल्लारी कारखान्याला राजाश्रय मिळाल्याने पुन्हा सुरु झाले परंतु नळेगाव कडे मात्र राज्याकर्त्यांनी डोळेजाक केली त्यामुळे तो आज ही बंद आहे. विशेष म्हणजे आज सहकार मंत्री बाबासाहेब पाटील दस्तूरखुद्द याच मतदार संघाचे विद्यमान आमदार आहेत. उसाची लागवड फार मोठ्या प्रमाणात झाल्याने उसाचे क्षेत्र सुद्धा भरपूर वाढून योग्य वेळी पाऊस झालेला असल्याने उत्पादन निश्चितच वाढणार आहे असा जाणकार आणि शेतकऱ्यांना विश्वास आहे. म्हणून कारखाना चालू हंगामात सुरु करावा अशी मागणी शेतकरी वर्ग करीत असून क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे,सत्तार पटेल, राजेंद्र मोरे अरुण दादा कुलकर्णी यांनी शेतकरी सभासद, कामगार आणि प्रशासकीय पातळीवर चर्चा केलेली असून त्वरित कारखाना सुरु करुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी सरकारकडे मागणी केली आहे.
लातूर जिल्ह्यात सुमारे सात तालुक्याच्या जवळपास 290 गावाचे कार्यक्षेत्र असलेल्या सर्वात जुना साखर कारखाना म्हणून नावारूपाचा दहा हजाराहून अधिक सभासदांचा हा कारखाना आहे. जिल्ह्यातील सर्वच कारखाने या हंगामासाठी सज्ज झाले आहेत. त्यात यावर्षी जय जवानजय किसान सह साखर कारखाना सुद्धा सुरु होण्यासाठी सहकारमंत्र्यांनी विशेष बाब म्हणून लक्ष घालावे. अन्यथा शेतकऱ्याच्या असंतोषाला समोरे जावं लागेल. शेतकऱ्याच्या हितासाठी कारखाना चालू होणे अतिशय गरजेचे आहे.त्वरित कारखाना सुरु करा नाहीतर
शेतकऱ्याच्या हितासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना कायमच रस्त्यावर आक्रमकपणे आंदोलन करीत असते. हा सुद्धा विषय शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा व हिताचा असल्याने आम्ही कारखाना चालू व्हावा यासाठी वाटेल ती भूमिका घेणार असा इशारा श्री सत्तार पटेल यांनी दिला आहे. लातुरात प्रशासकीय स्तरावर चर्चेवेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कोअर कमिटी सदस्य राजेंद्र मोरे, सत्तार पटेल, अरुण दादा कुलकर्णी,प्रज्योत हुडे, नवनाथ शिंदे, व्यंकट यादव, अनंत कांबळे,अमर हैबतपुरे,शिवकुमार रामशेटे, शरद रामशेटे,जयप्रकाश नंदगावे, दत्ता बिरादार, निलेश बिरादार, गौतम कांबळे, इमाम सय्यद, भुराबाई राठोड,दत्ता किणीकर, धनराज गुट्टे उपस्थित होते.