उष्णतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी राबविले जाणार अमृतधारा अभियान


‘उष्णतेशी लढा’ देण्यासाठी सन २०३२ पर्यंत ‘हरित लातूर’ संकल्पना प्रत्यक्षात आणणार !

• उष्णतेशी लढा कार्यशाळेत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला निर्धार
• ‘उष्णतेशी लढा’ विषयावर लातूर येथे राज्यातील पहिलीच कार्यशाळा
• ‘रुफ वॉटर हार्वेस्टिंग’द्वारे पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरविणार

लातूर, दि. ०२ :  जिल्ह्यात उष्णतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, या अनुषंगाने विचारमंथन करण्यासाठी लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणमार्फत ‘उष्णतेशी लढा’ या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या या कार्यशाळेत विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे म्हणाल्या की, लातूर जिल्ह्यातील उष्णतेचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यात येतील. त्याची सुरुवात ‘रुफ वॉटर हार्वेस्टिंग’ उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करून केली जाईल. यासाठी ‘अमृतधारा अभियान’ हाती घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर यावेळी उपस्थित होते. तसेच नवी दिल्ली येथील सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटच्या शाश्वत अधिवास विभागाचे प्रमुख रजनीश सरीन, पुणे येथील ज्येष्ठ वास्तुविशारद अविनाश हावळ, सार्वजनिक आरोग्य चळवळीतील तज्ज्ञ डॉ. अनंत फडके यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले.

वातावरणीय बदलामुळे उष्णतेच्या लाटा सारखे संकटे येत आहेत. त्यामुळे केवळ भौगोलिकच नाही, तर आर्थिक परिणामही दिसून येत आहेत. जवळपास ४० टक्के अर्थकारण हवामान बदलामुळे प्रभावित होत असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. उष्णतेच्या लाटेमुळे जगभरात लाखो लोकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. आपल्या जिल्ह्यातही काही प्रमाणात उष्णतेच्या लाटेची समस्या जाणवते आहे. आगामी काळात हे संकट अधिक तीव्र होवू नये, यासाठी लवकर उपाययोजना हाती घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक पाऊल उचलेले जाईल. लातूर जिल्ह्याला ५० वर्षे पूर्ण होईपर्यंत म्हणजेच सन २०३२ पर्यंत वृक्ष लागवड आणि संवर्धनावर भर देवून ‘हरित लातूर’ ही संकल्पना प्रत्यक्ष आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले.

लातूर जिल्ह्यात पुढील दोन महिन्यात ‘अमृतधारा अभियान’ प्रभावीपणे राबवून ‘रुफ वॉटर हार्वेस्टिंग’साठी विविध कामे केली जातील. प्रत्येक शासकीय इमारतीसह खासगी इमारतींवरही ‘रुफ वॉटर हार्वेस्टिंग’ करण्यासाठी लोकसहभागातून हे अभियान राबविले जाईल. आगामी काळात पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुराविण्याला प्राधान्य दिले जाईल, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या. सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी आपले कार्यालय, आपले राहते घर येथे ‘रुफ वॉटर हार्वेस्टिंग’ करून या अभियानात सक्रीय सहभाग नोंदवावा. तसेच विहीर पुनर्भरण, वृक्ष लागवड आदी उपक्रमालाही गती द्यावी, असे त्यांनी सांगितले.

*पर्यावरण संवर्धनासाठी उपाययोजना हाती घेणे गरजेचे : श्री. देऊळगावकर*

गेल्या काही वर्षात वातावरणीय बदलांमुळे झालेल्या परिणामांचा सामना लातूर जिल्ह्यातील नागरिकांना करावा लागला आहे. आगामी काही वर्षात यापेक्षाही अधिक गंभीर संकटाला आपल्याला सामोरे जावे लागेल. त्यामुळे वेळीच सावध होवून पर्यावरण संवर्धनासाठी उपाययोजना हाती घेण्याची आवश्यकता आहे. सध्या मोठ्या प्रमाणात शहरांचे काँक्रीटीकरण होत आहे, वृक्षांची संख्या कमी झाल्याने शहरात अधिक उष्णता जाणवते. शहरातील इमारतींचे बांधकाम करताना काही छोटे-छोटे बदल केल्यास उष्णतेवर नियंत्रण मिळविणे शक्य आहे. बांधकामासाठी वापरले जाणाऱ्या विटा यासारखे साहित्य निवडताना त्याची उष्णता शोषून घेण्याची क्षमता पाहूनच बांधकामासाठी वापर करावा. तसेच शहरामध्ये वृक्ष लागवड, हिरवी उद्याने निर्माण करायला हवीत, असे ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी सांगितले.

*उष्णतेची लाट रोखण्यासाठी पर्यावरणाच्या लढाईचे शिलेदार व्हा : रजनीश सरीन*

लातूर जिल्ह्यातील हवामा पाहिले, तर काही उपाययोजना प्रभावीपणे केल्यास जिल्ह्यातील उष्णतेचे प्रमाण कमी करता येणे शक्य आहे. त्यासाठी सर्व नागरिकांनी पर्यावरणाच्या लढाईचे शिलेदार होवून काम करावे, असे आवाहन नवी दिल्ली येथील सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटच्या शाश्वत अधिवास विभागाचे प्रमुख रजनीश सरीन म्हणाले. देशातील काही जिल्ह्यांमध्ये सध्या उष्णतेमुळे धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. लातूरला त्या दिशेने जाण्यापासून रोखण्यासाठी जलसंवर्धन व वृक्ष संवर्धनावर भर देण्याची गरज आहे. तसेच इमारतीचे बांधकाम करताना परिसरात वृक्ष लागवड, हवा खेळती राहावी यासाठी शहरामध्ये ‘कुलिंग मास्टर प्लान’ तयार करण्याची गरज आहे. यामध्ये वृक्ष लागवड, उद्याने याचे योग्य नियोजन करून शहरात जास्तीत जास्त वृक्ष लागवडीवर भर देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

*ग्रीन बिल्डींग संकल्पना अंमलात आणण्याची गरज : श्री. हावळ*

हवामानातील बदलांचा दुष्परिणाम म्हणून यावर्षी उष्णतेची लाट दीर्घकाळ राहण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. उष्णतेच्या लाटेवर नियंत्रण मिळविणे, तसेच आगामी काळात या संकटापासून सुटका करून घेण्यासाठी तातडीच्या उपाययोजना आणि दीर्घकालीन उपाययोजना अशा दोन प्रकारच्या उपाययोजना हाती घेणे आवश्यक असल्याचे पुणे येथील ज्येष्ठ वास्तुविशारद अविनाश हावळ यांनी सांगितले. तातडीने करावयाच्या उपाययोजनांमध्ये अस्तित्वात असलेल्या इमारतींच्या परिसरात वृक्ष लागवड, टेरेस गार्डन, सौरऊर्जा निर्मिती, बायोगॅसची निर्मिती व वापर, रुफ वॉटर हार्वेस्टिंग यासारख्या बाबींवर लक्ष द्यावे लागेल. तसेच दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये नवीन इमारतीचे बांधकाम करताना ग्रीन बिल्डींग संकल्पना अंमलात आणणे, शहरातील हरित पट्टे विकसित करण्याचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

सार्वजनिक आरोग्य चळवळीतील तज्ज्ञ डॉ. अनंत फडके यांनी उष्माघाताची कारणे, उष्माघात झाल्यानंतर घ्यावयाची खबरदारी आदी बाबींवर मार्गदर्शन केले. तसेच उष्माघातापासून बचावासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करावी, अशा परिस्थितीत काय खबरदारी घ्यावी, याबाबत नागरिकांना माहिती देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. साकिब उस्मानी यांनी केले.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर