_लातूर जिल्ह्यात दिव्यांग बांधवांच्या नोंदणीसाठी उद्यापासून विशेष मोहीम !_*जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीची ऑनलाईन नाव नोंदणी करावी -जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे*


लातूर, दि. ०३ : जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी ५ मार्च ते २५ मार्च २०२५ या कालावधीत जिल्ह्यात विशेष मोहीम राबविली जाणार आहे. यासाठी महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायत स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करून प्रत्येक दिव्यांग व्यक्तीच्या नावाची पडताळणी करून त्यांचे नाव ऑनलाईन पोर्टलवर नोंदवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज येथे दिल्या.

जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या जिल्हा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, सामाजिक न्याय विभागाच्या केंद्रीय सल्लागार मंडळाचे सदस्य सुरेश पाटील, संवेदना प्रकल्पाचे कार्यवाह डॉ. योगेश निटूरकर, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, तहसीलदार सौदागर तांदळे, नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त मंगेश शिंदे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, पोलीस उपाधीक्षक गजानन भातलवंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र निळकंठ यावेळी उपस्थित होते.

प्रत्येक दिव्यांग व्यक्तीची ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायत पातळीवरील अधिकारी, कर्मचारी यांनी संवेदनशीलपणे काम करावे. आपल्या कार्यक्षेत्रातील एकही दिव्यांग व्यक्ती नाव नोंदणीपासून वंचित राहू नये, यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या ऑनलाईन यादीची पडताळणी करावी. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालय यांच्यामार्फत वितरीत करण्यात आलेल्या दिव्यांग दाखल्यांची यादी प्राप्त करून घेवून त्यानुसार आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी यावेळी दिल्या. तसेच या कामासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना आवश्यक प्रशिक्षण देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

दिव्यांग व्यक्तींना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी https://sanvedanalatur.org/ या संकेतस्थळावर त्यांची ऑनलाईन नोंदणी केली जात आहे. या संकेतस्थळावर ‘माझी नोंदणी’ या पर्यायावर क्लिक करून आपला आधार क्रमांक टाकावा. त्यानंतर पासवर्ड तयार करावा. नोंदणीवेळी दिव्यांग प्रमाणपत्र, छायाचित्र, आधार कार्ड, रेशनकार्ड आदी कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक असल्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री. नाईकवाडी व संवेदना प्रकल्पाचे व्यंकट लामजने यांनी सांगितले. डॉ. निटूरकर यांनी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या कामकाजाची माहिती दिली.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर