जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केली प्रशासकीय इमारतीची पाहणी
*जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केली मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील कार्यालयांची पाहणी*
लातूर, दि. २७ : जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील विविध शासकीय कार्यालयांना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी भेट दिली. शासनाच्या शंभर दिवसीय सात कलमी कृती कार्यक्रमांतर्गत करण्यात येत असलेल्या कामकाजाची त्यांनी पाहणी केली. तसेच या इमारतीमधील प्रशासकीय विभाग प्रमुखांची त्यांनी बैठक घेतली.
जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. उज्ज्वला पाटील, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रमेश जाधव, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक केशव राऊत, आत्माचे प्रकल्प संचालक शिवसांब लाडके, जिल्हा जलसंधारण अधिकारी अनिल कांबळे यांच्यासह अन्न औषध प्रशासन, सहकार संस्थेचे सहनिबंधक, उपनिबंधक यावेळी उपस्थित होते.
मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये असलेल्या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये व परिसरात स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. तसेच कार्यालयातील अभिलेखांचे योग्य प्रकारे वर्गीकरण करावे. कार्यालयामध्ये येणाऱ्या अभ्यागतांसाठी स्वतंत्र कक्ष, पिण्याचे पाणी उपलब्ध करावे. दर्शनी भागात विभागाशी संबंधित योजनांची माहिती लावावी. प्रत्येक कर्मचारी यांचे नाव, त्यांच्याकडे सोपविलेल्या जबाबदाऱ्यांची माहिती दर्शनी भागात लावावी, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले.
जिल्हा कोषागार कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क विभाग, सिटी सर्व्हे कार्यालय, जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालय, कृषि विभाग, विभागीय माहिती कार्यालय, आत्मा कार्यालय, जिल्हा दुग्धविकास अधिकारी कार्यालय आदी कार्यालयांना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर घुगे यांनी यावेळी भेटी दिल्या. तसेच इमारतीच्या परिसराची पाहणी करून सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका यांना स्वच्छतेबाबत सूचना दिल्या.