महापुरुषांच्या कार्यातून तरुणांनी प्रेरणा घ्यावीप्रा. किसनाथ कुडके लातूर*नंदादीप वार्ता न्यूज, लातूर*
लातूर दि. 25 : महापुरुषांनी प्राणांची आहूती देऊन भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे, त्यांच्या कार्याची प्रेरणा तरुणांनी सदैव समोर ठेवून राष्ट्र निर्माण करिता भरीव योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. किसनाथ कुडके यांनी केले.
महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना, लातूर आणि आम्ही सेवक, हैप्पी व्हिलेज, हासेगाव ता.औसा जि.लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने हॅप्पी व्हिलेज, हासेगाव येथे “युथ फॉर माय भारत व युथ फॉर डिजिटल लिटरसी विशेष युवक वार्षिक शिबिरातील बौद्धिक सत्रात बोलत होते.
यावेळी विचारपीठावर अध्यक्षस्थानी प्रो. डॉ. शिवप्रसाद डोंगरे हे होते तर मंचावर कार्यक्रमाधिकारी डॉ. रत्नाकर बेडगे, डॉ. मनोहर चपळे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना प्रा. कुडके म्हणाले की, भारताचा इतिहास हा भव्य दिव्य अशा क्रांतीचा, कीर्तीचा आहे. देशाच्या जडणघडणीत अनेक महापुरुषांनी भरीव योगदान दिले आहे. तरुणांनी हा इतिहास न विसरता राष्ट्रनिर्माणात आपले योगदान दिले पाहिजे. राष्ट्रासमोरील आव्हाने, समस्या प्रतिकूलता याला सामोरे जाऊन आत्मनिर्भर, स्वावलंबी, समृद्ध आणि सुदृढ देशाचे भवितव्य घडवण्याकरता सदैव तत्पर असले पाहिजे असेही ते म्हणाले.
अध्यक्षीय समारोपात डॉ. शिवप्रसाद डोंगरे म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजना ही संस्कारांची शाळा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून कार्य करत असतो .भारत देश हा खेड्यांचा देश आहे. ग्रामीण भागाचा सर्वतोपरी विकास करण्याचा प्रयत्न तरुणांनी करायला हवा असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मनोहर चपळे यांनी केले, सूत्रसंचालन कृष्णा धरणे यांनी केले तर आभार डॉ. रत्नाकर बेडगे यांनी मानले.
या कार्यक्रमाला रासेयो स्वयंसेवक-स्वयंसेविका आणि हॅपी व्हिलेज येथील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.