*औसा येथे ५ मार्च रोजी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा*
लातूर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन, मॉडेल करिअर सेंटर व औसा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) यांच्या संयुक्त विद्यमाने ५ मार्च २०२५ रोजी सकाळी १० वाजता औसा आयटीआय येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या रोजगार मेळाव्यात रोजगार देणारे एकूण १० पेक्षा जास्त आस्थापना, उद्योजक यांनी ३३० रिक्तपदे अधिसूचित केली आहेत.
जहिराबाद येथील जीआयएस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी ट्रेनी तथा ऑपरेटरची ५० पदे अधिसूचित केली असून या पदांसाठी आयटीआय, डिप्लोमा सर्व ट्रेड केलेले उमेदवार पात्र राहतील. पुणे येथील अलाईड रिसोर्स मॅनेजमेंट सर्व्हिसेस इंडिया प्रा.लि. यांनी ट्रेनीची ६५ पदे अधिसूचित केली असून यासाठी इयत्ता दहावी, बारावी, कोणतीही पदवी तथा आयटीआय किंवा डिप्लोमा अशी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. पुणे येथील महिंद्रा अॅन्ड महिंद्रा कंपनी तथा पुणे चाकण येथील युनो मिंडा कंपनीमध्ये ट्रेनीच्या ५० जागा भरल्या जाणार असून यासाठी इयत्ता दहावी, बारावी, कोणतीही पदवी, आय टी आय किंवा डिप्लोमा सर्व ट्रेड अशी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. पुणे येथील भास्कर सर्व्हिसेस अॅन्ड सप्लायर्स इंडिया प्रा.लि. मध्ये ट्रेनी, ऑपरेटर, पेंटर, हेल्परच्या ७० जागा भरल्या जाणार असून यासाठी इयत्ता दहावी, बारावी, कोणतीही पदवी, आय टी आय किंवा डिप्लोमा इंजि. अशी शैक्षणिक पात्रता आवश्यक राहील.
पुणे येथील टॅलेंट सेतू प्रा.लि.मध्ये ट्रेनीच्या ३० जागा भरल्या जाणार असून आयटीआय, डिप्लोमा सर्व ट्रेड अशी शैक्षणिक पात्रता आवश्यक राहील. आधार सोलार बॅक अप पावर सिस्टीममध्ये टेक्निशियनच्या ५ जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी आय टी आय (इलेक्ट्रिशियन/वेल्डर) अशी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. सोलापूर येथील सनसुर सृष्टी इंडिया प्रा.लि. या आस्थापनेत असिस्टंट मॅनेजर, ब्रँच मॅनेजर, बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसरच्या २० जागा भरण्यात येणार असून यासाठी इयत्ता दहावी, बारावी, कोणतीही पदवी अशी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. मुथुट मायक्रोफिन प्रा.लि.मध्ये रिजनल ऑफिसर, फिल्ड ऑफिसरच्या २० जागा भरण्यात येणार असून यासाठी इयत्ता बारावी, कोणतीही पदवी अशी पात्रता निश्चित करण्यात आली आहे. लातूर येथील लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये एलआयसी ऍडवाझरच्या १० जागा भरल्या जाणार असून इयत्ता दहावी, बारावी, कोणतीही पदवी अशी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. लातूर येथील क्रेडिट अॅक्सीस ग्रामिण लि.मध्ये रिलेशनशिप ऑफिसरच्या १० जागा भरण्यात येणार असून यासाठी कोणतीही पदवी धारण केलेले उमेदवार पात्र राहतील.
या सर्व रिक्त पदांसाठी इच्छूक उमेदवारांनी ५ मार्च, २०२५ रोजी सकाळी १० वाजता औसा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथे स्वखर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. सोबत आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, स्वतःचा रिझ्युम तथा बायोडाटा, पासपोर्ट फोटो हे सर्व पाच प्रतीत आणणे आवश्यक आहे. या संधीचा लातूर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे अवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक आयुक्त यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी लातूर येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाच्या ०२३८२-२९९४६२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.