*लातूर येथे लेखा व कोषागारे दिन विविध उपक्रमांनी साजरा*• ‘जीवनातील सकारात्मक दृष्टीकोन’ विषयी डॉ. विठ्ठल लहाने यांचे मार्गदर्शन•
*लातूर येथे लेखा व कोषागारे दिन विविध उपक्रमांनी साजरा*
• ‘जीवनातील सकारात्मक दृष्टीकोन’ विषयी डॉ. विठ्ठल लहाने यांचे मार्गदर्शन
• सांस्कृतिक कार्यक्रमात अधिकारी, कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
*नंदादीप वार्ता*
लातूर : जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत लेखा व कोषागार दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वित्त विभागांतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील विविध कार्यालयांमधील अधिकारी, कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठल लहाने यांनी यावेळी जीवनातील सकरात्मक दृष्टीकोन याविषयी मार्गदर्शन केले.
राज्य शासनाने १फेब्रुवारी १९६५ रोजी महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेची स्थापना केली. त्यामुळे हा १ फेब्रुवारी हा दिवस लेखा व कोषागारे दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने लातूर जिल्हा कोषागार कार्यालयाच्यावतीने मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. उज्ज्वला पाटील होत्या. तसेच लातूर शहर महानगरपालिकेच्या मुख्य लेखा अधिकारी कांचन तावडे, सहायक संचालक वनिता देवरे, स्थानिक निधी लेखा परीक्षणचे प्रभारी सहायक संचालक श्याम कडेकर यांच्यासह महाराष्ट्र वित्त व लेखा संवर्गातील अधिकारी, कर्मचारी पारंपारिक वेशभूषेत उपस्थित होते.
कोणत्याही क्षेत्रात काम करताना वेळेला वेळेचे योग्य नियोजन आवश्यक आहे. शासकीय अथवा खासगी क्षेत्रात नोकरी करताना कार्यालयीन कामकाज आणि कौटुंबिक जीवन याचा योग्य मेळ घालून आयुष्य जगले पाहिजे. कार्यालयात सोपविण्यात आलेली कामे त्या-त्या वेळी पूर्ण करण्याला प्राधान्य द्यायला हवे. कार्यालय आणि कुटुंब यांच्यासाठी द्यावयाच्या वेळेचे योग्य नियोजन केल्यास कोणत्याही आपल्यावरील जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडणे शक्य होईल, असे डॉ. विठ्ठल लहाने यांनी यावेळी सांगितले. तसेच आयुष्यात नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून काम करावे. कार्यालय, तसेच कुटुंबात किरकोळ कारणांमुळे होणारे वाद टाळून दोन्ही ठिकाणी कुटुंब म्हणून काम केल्यास मानसिक ताणतणावाचे प्रसंग उद्भवणार नाहीत, असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. उज्ज्वला पाटील यांनी लेखा व कोषागारे दिनाची पार्श्वभूमी विषद केली. तसेच लेखा व कोषागार दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात जिल्ह्यातील वित्त विभागाच्या विविध कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेवून आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोषागार कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.