सोयाबीन खरेदीसाठी 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदतवाढ द्यावी
सोयाबीन खरेदीसाठी 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदतवाढ द्यावी- महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे उपसभापती संतोष सोमवंशी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
*नंदादीप वार्ता*
लातूर: आज पर्यंत नोंदणी केलेले एकूण शेतकरी बांधवांपैकी केवळ 50% शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली, बाकी इतर राहिलेल्या 50% शेतकऱ्यांना 31 जानेवारी पर्यंत इतक्या कमी कालावधीत खरेदी करणे अशक्य आहे, त्यामुळे सोयाबीन खरेदीला 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे उपसभापती संतोष सोमवंशी यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका पत्राद्वारे मागणी केली आहे.
सोयाबीन खरेदीच्या सुरुवातीला आद्रता आणि त्यानंतर बारदाना तुटवडयामुळे अनेक शेतकरी बांधवांना हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीन घालता आलेली नाही. नोंदणीकृत शेतकऱ्यांची एकूण संख्या आणि बाजारात हमीभाव मिळत नसल्याने हमीभाव खरेदी केंद्राकडे वाढलेला शेतकऱ्याचा कौल पाहता अधिकाधिक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव योजनेचा लाभ मिळणे आवश्यक आहे त्यासाठी 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती संतोष यांनी सोमवंशी यांनी केली आहे.