स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : औसा येथील शेळी चोरीचा गुन्हा उघडकीस; दोन आरोपी जेरबंद, 2 लाख 19 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : औसा येथील शेळी चोरीचा गुन्हा उघडकीस; दोन आरोपी जेरबंद, 2 लाख 19 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

          लातूर, दि.06:- लातूर जिल्ह्यात मालमत्तेविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेकडून सातत्याने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत औसा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या शेळी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत दोन आरोपींना अटक करून चोरीस गेलेल्या तीन शेळ्या तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेला ऑटो असा एकूण 2 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
                 औसा पोलीस ठाणे गु.र.नं. 296/2026, कलम 303(2) भारतीय न्याय संहिता अन्वये दाखल असलेल्या शेळी चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना दिनांक 05 जून 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने साई नाका ते डी-मार्ट रोडवरील सापळा रचून रात्री सुमारे 11.20 वाजण्याच्या सुमारास संशयित ऑटो थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये तीन जिवंत शेळ्या आढळून आल्या. चौकशीदरम्यान संबंधितांनी त्या शेळ्या आलमला रोड परिसरातील पत्र्याच्या शेडमधून चोरी केल्याची कबुली दिली.
या कारवाईत आरोपी 

1) रुपेश संतोष बनसोडे (वय 28 वर्षे, रा. भाडगाव, ता. जि. लातूर) 

2) गजानन राम जाधव (वय 32 वर्षे, रा. खाडगाव रोड, लातूर) 
     
               यांना ताब्यात घेण्यात आले.आरोपींकडून चोरीस गेलेल्या तीन जिवंत शेळ्या, तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेला बजाज कंपनीचा ऑटो रिक्षा (क्र. एमएच-24 एटी-5334)  एकूण 2 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
                 सदर कारवाई पोलीस अधीक्षक लातूर श्री अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील उपनिरीक्षक राजेश घाडगे, पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस अमलदार रियाज सौदागर, साहेबराव  हाके, अर्जुनसिंग राजपूत, विनोद चलवाड, मनोज खोसे, आनंद हल्लाळे, प्रविण कोळसुरे, संतोष खांडेकर यांच्या पथकाने पार पाडली.
                 दोन्ही आरोपींना पुढील तपास व कायदेशीर कारवाईसाठी मुद्देमालासह औसा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.